
- न्यायालयीन आदेश डावलणाऱ्या शाळा प्रशासनाला जोरदार दणका ; दिलीप नैताम यांना मूळ पदावर रुजू करण्याचे शिक्षण उपसंचालकांचे आदेश.
मूल. प्रतिनिधी न्यूज जागर (चेतन कामडे )
गडचिरोली शाळा न्यायाधिकरणाच्या आदेशानंतरही सहाय्यक शिक्षकाला सेवेत रुजू करून न घेणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील मोहोली येथील त्यागमूर्ती सोनिया गांधी माध्यमिक विद्यालयाच्या प्रशासनाला विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दणका दिला आहे. शिक्षण उपसंचालक माधुरी सावरकर यांनी सहाय्यक शिक्षक दिलीप गोपीनाथ नैताम यांना त्यांच्या मूळ पदावर तात्काळ रुजू करून घेण्याचे तसेच त्यांचे प्रलंबित वेतन अदा करण्याचे आदेश जारी केले आहेत.
यापूर्वी शाळा न्यायाधिकरण, चंद्रपूर यांनी दिलीप नैताम यांच्या बाजूने निर्णय दिला होता. या निर्णयाविरोधात संस्थेने नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली; मात्र उच्च न्यायालयाने न्यायाधिकरणाच्या निर्णयाला कोणतीही स्थगिती दिली नाही. त्यामुळे न्यायाधिकरणाचा आदेश अंमलात आणणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याच पार्श्वभूमीवर शिक्षण उपसंचालकांनी संबंधित शाळा प्रशासनाला न्यायाधिकरणाच्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करून कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
या प्रदीर्घ न्यायलढ्यात सामाजिक कार्यकर्ते तसेच इंडियन नॅशनल ट्रेड्स युनियन काँग्रेस (इंटक) फेडरेशनचे नागपूर विभाग प्रभारी व चंद्रपूर जिल्हाध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांनी अन्यायाविरोधात सातत्याने पाठपुरावा केला. तसेच ‘विदर्भाचा वीर’ वृत्तपत्रानेही या प्रकरणाचा वस्तुनिष्ठरीत्या पाठपुरावा करून प्रशासनाचे लक्ष वेधले.
या संयुक्त प्रयत्नांनंतर अखेर प्रशासनाने दखल घेत संबंधित शिक्षकाला न्याय मिळवून देण्याच्या दिशेने ठोस पाऊल उचलले असून, दीर्घ संघर्षानंतर दिलीप नैताम यांना दिलासादायी न्याय मिळाला आहे.तसेच दत्तात्रय समर्थ यांच्या सततच्या पाठपुराव्याला खूप मोठ यश मिळाला आहे..

