
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
तालुक्यातील कोसमी–भटगाव मार्गे कोटगुल या प्रमुख रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मागील तीन महिन्यांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम मंजूर असूनही प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या रस्त्याच्या कामासाठी टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊनही काम रखडले असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. दररोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असून, अपघाताची शक्यता वाढली आहे.


या प्रकरणी जबाबदार कोण—शासन की प्रशासकीय अधिकारी? असा सवाल आता जनतेकडून उपस्थित केला जात आहे. तीन महिन्यांपासून काम प्रलंबित राहणे हे गंभीर दुर्लक्ष असून, याची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग (जिल्हा परिषद) अधिकाऱ्यांवर असल्याचा आरोप होत आहे.

