
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली, दि. १ जुलै : भारतीय जनता पक्षाचे अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांचा वाढदिवस बुधवारी (१ जुलै) केक कापण्याऐवजी समाजसेवा, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला.
वाढदिवसानिमित्त सकाळी चामोर्शी रोडवरील जनसंपर्क कार्यालयात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर गडचिरोलीचे आराध्य दैवत सेमाना देवस्थान येथे दर्शन व पूजा-अर्चना करून परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात अनेक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

यानंतर चामोर्शी रोडवरील मातोश्री वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांची भेट घेऊन त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्यांच्याशी संवाद साधत वाढदिवसाचा आनंद वाटून घेण्यात आला.त्यानंतर गांधी चौक येथील महिला व बाल रुग्णालयात “एक घास माणुसकीचा” या उपक्रमांतर्गत रुग्णांच्या नातेवाईकांना भोजनाचे वाटप करण्यात आले. तसेच रुग्णांना फळांचे वितरण करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली.
यावेळी समाजातील गरजू घटकांप्रती संवेदनशीलता आणि सेवाभाव जपण्याचा संदेश देण्यात आला.
याच दिवशी डॉ. अशोकजी नेते यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ₹१ लाखांचा धनादेश सुपूर्द करून सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव अधोरेखित केली. त्यांच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
सायंकाळी गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील गोविंदपूर येथील विला अर्बन फॅमिली हॉटेल अँड रेस्टॉरंट येथे अभिष्टचिंतन सोहळा पार पडला.
विविध क्षेत्रांतील मान्यवर, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिकांनी उपस्थित राहून डॉ. अशोकजी नेते यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि अखंड जनसेवेच्या शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रासह विविध भागांतून आलेल्या पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी दिवसभर जनसंपर्क कार्यालयात भेट देऊन पुष्पगुच्छ अर्पण करत वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला.
केक कापण्याऐवजी समाजसेवा, वृक्षारोपण, ज्येष्ठांचा सन्मान, रुग्णसेवा आणि सामाजिक उत्तरदायित्व अशा उपक्रमांद्वारे वाढदिवस साजरा करण्याची परंपरा डॉ. अशोकजी नेते यांनी यंदाही कायम ठेवली. सेवाभावाचा संदेश देणारा हा वाढदिवस अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला.

