
गडचिरोली : चामोर्शी येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेतील आरोपींविरुद्ध जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी, या मागणीसाठी माजी आमदार तथा भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
यावेळी महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. अशा घटना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविणे, महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलणे आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करणे, अशी मागणीही करण्यात आली.
यावर पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी सदर प्रकरणात आरोपीविरुद्ध गुन्हा क्र. २८०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम ६४(१), ६५(२) तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम (पॉक्सो) २०१२ च्या कलम ४ व ६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच पीडित कुटुंबाला संपूर्ण संरक्षण देण्यात आले असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलीस विभागामार्फत सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या निवेदनावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, दिलीप चलाख तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत समाजात तीव्र संताप व्यक्त होत असून दोषींना कठोर शिक्षा करून अशा प्रवृत्तींना आळा घालण्याची मागणी नागरिकांकडूनही होत आहे.

