
नितेश गट्टीवार न्यूज जागर गडचिरोली/कुरखेडा :
समस्त आदिवासी समाज संघटना तालुका कुरखेडा, आरमोरी, देसाईगंज, कोरची व धानोरा यांच्या वतीने तसेच आमदार रामदासजी मसराम यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ कुरखेडा येथे ‘उलगुलान व तीव्र निषेध मोर्चा’ काढण्यात आला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आदिवासी समाजाचा उल्लेख “वनवासी” असा केल्याच्या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आदिवासी समाजाची ऐतिहासिक, सांस्कृतिक व सामाजिक ओळख स्वतंत्र असून “आदिवासी” हीच त्यांची संविधानमान्य ओळख असल्याचे आंदोलनकर्त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मोर्चामध्ये विविध भागांतील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे यांनी उपस्थित राहून आदिवासी समाजाच्या विविध मागण्या, हक्क आणि अस्मितेच्या लढ्याला जाहीर पाठिंबा दर्शविला.
मोर्चादरम्यान आदिवासी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी एकजुटीने संघर्ष करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. आदिवासी समाजाची एकता, संघटनशक्ती आणि हक्कांबाबतची जागरूकता या मोर्चातून प्रकर्षाने दिसून आली.
यावेळी “जय आदिवासी, जय जोहार, जय संविधान” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. विविध मागण्यांच्या समर्थनार्थ तसेच केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलकांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधातही घोषणाबाजी केली. आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी सुरू असलेला लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

