
अरुण बारसागडे , उपसंपादक, न्यूज जागर चंद्रपूर
वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) अंतर्गत माती व कोळसा उत्खनन करणाऱ्या कंत्राटी कंपन्यांमध्ये स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगारामध्ये प्राधान्य द्यावे, या प्रमुख मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर समोर सुरू असलेल्या आमरण उपोषणाला राजकीय पाठिंबा मिळू लागला आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी शुक्रवारी उपोषण मंडपाला भेट देत आंदोलनकर्त्यांची भेट घेतली.
दि. १ जून २०२६ पासून सुरू असलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व रोशन राजाराम हरबडे व नंथु भाऊराव नवले करीत असून, मागील पाच दिवसांपासून विविध लोकशाही मार्गाने शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
आंदोलनस्थळी पोहोचलेल्या सुभाषभाऊ धोटे यांनी उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली तसेच त्यांच्या मागण्या सविस्तर जाणून घेतल्या. स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य मिळणे हा त्यांचा न्याय्य हक्क असून, या मागण्यांना काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली. स्थानिक युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे सांगत, त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी काँग्रेस पक्ष कायम पाठीशी राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. #chandrapur

