
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
कोरची, दि. 05 जून 2026 : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गडचिरोली जिल्हा पोलीस दल व पोलीस स्टेशन कोरची यांच्या वतीने विविध पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. मा. सपोनि मुकुंद देशमुख, प्रभारी अधिकारी, पोलीस स्टेशन कोरची यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 07:00 वाजता पोलीस स्टेशन परिसरात कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार, एसआरपीएफ अधिकारी व जवान, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक, सरपंच आणि पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत पर्यावरण संवर्धनाची शपथ घेण्यात आली. “एक वृक्ष लागवड” या संकल्पनेतून पोलीस स्टेशन आवारात एकूण 45 आंबा या फळझाडांची लागवड करण्यात आली.
यानंतर पर्यावरणाचे संवर्धन, पर्यावरण संतुलन राखणे व प्लास्टिक मुक्त परिसर निर्माण करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने पोलीस स्टेशन कोरची ते कोरची शहरापर्यंत जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये पर्यावरण संरक्षण व प्लास्टिक बंदी संदर्भातील संदेश देणारे फलक सहभागींच्या हाती होते.

सदर उपक्रमांद्वारे नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता सकाळी 09:30 वाजता करण्यात आली.
पर्यावरण रक्षणासाठी पोलीस दलाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे #gadchiroli police #newsjagar #korchi

