
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
कोरची तालुक्यातील अतिदुर्गम भागातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कामांसाठी होणाऱ्या प्रचंड हालअपेष्टांवर उपाय म्हणून तलाठी कार्यालयांची उभारणी करण्यात आली. मात्र ही कार्यालये पूर्ण होऊनही अद्याप सुरू न झाल्याने प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांना शेतीविषयक कामे, महसूल नोंदी, विविध शासकीय योजना यांचा लाभ गावपातळीवरच मिळावा, यासाठी तहसीलदार प्रशांत गड्डम यांनी पुढाकार घेत 13 तलाठी कार्यालय वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला. जागा उपलब्ध करून प्रस्ताव सादर करण्यात आला आणि त्यापैकी बेतकाठी, नांदळी, मर्केकसा, बेलगाव घाट, कोटरा या ठिकाणी तलाठी कार्यालयांचे बांधकाम पूर्ण झाले. उर्वरित तलाठी कार्यालयाचे बांधकाम तात्काळ पूर्ण करून द्यावे अशी मागणी केली जात आहे,

परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रियतेमुळे ही इमारती अजूनही वापरात आलेल्या नाहीत. विद्युत फिटिंग, इलेक्ट्रिक मीटर, पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधा अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे बांधकाम पूर्ण होऊनही या इमारती महसूल विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या नाहीत.
दरम्यान, सध्या अनेक ठिकाणी तलाठी कार्यालये भाड्याच्या अरुंद जागेत चालवली जात असून शेतकऱ्यांना बसण्यासाठीही जागा उपलब्ध नसते. त्यामुळे आर्थिकच नव्हे तर मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे.
“कार्यालये उभी आहेत, पण कामकाज सुरू नाही” या विसंगतीमुळे स्थानिक शेतकरी व नागरिक संतप्त झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ‘लेट-लतीफ’ कारभारामुळे सर्व सुविधा युक्त कार्यालये हस्तांतरित करण्यास उशीर होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
आता प्रश्न असा उपस्थित होत आहे की, पूर्ण झालेल्या तलाठी कार्यालयांमध्ये प्रत्यक्ष कामकाज कधी सुरू होणार? प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन आवश्यक सुविधा पूर्ण करून ही कार्यालये लवकरात लवकर सुरू करावीत, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
तालुक्यात 13 तलाठी कार्यालय मंजूर झाले असून त्यापैकी सहा तलाठी कार्यालय पूर्ण बांधकाम झालेले आहे उर्वरित तलाठी कार्यालय लवकरच पूर्ण केले जातील याच महिन्याच्या शेवटपर्यंत पूर्ण झालेले तलाठी कार्यालय हस्तांतरित केले जातील आर एस चड्डा उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कोरची

