
मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांनी सहभागी होण्याचे महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे आवाहन
नितेश गट्टीवार न्यूज जागर गडचिरोली दि.२८ मे :
गडचिरोली जिल्ह्याला ‘स्टील हब’ बनविण्याच्या नावाखाली महायुती-भाजप सरकार जिल्ह्याचे नुकसान करीत असल्याचा आरोप करत, शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींच्या अधिग्रहणाविरोधात ४ जून २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली आहे.

जिल्ह्यातील स्थानिक शेतकऱ्यांचा वारंवार विरोध असतानाही एमआयडीसी, विमानतळ तसेच इतर विविध प्रकल्पांसाठी शासनाकडून शेतकऱ्यांशी कोणताही विचारविनिमय न करता सुपीक शेतजमिनी अधिग्रहित करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी अल्पभूधारक असून त्यांचा संपूर्ण उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत सुपीक जमिनी अधिग्रहित करणे म्हणजे शेतकऱ्यांना उध्वस्त करण्यासारखे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
गडचिरोली तालुक्यातील हिरापूर, गुरुवळा, राखी, आणि शिरपूरचक येथे प्रस्तावित विमानतळाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. तसेच चामोर्शी तालुक्यातील प्रस्तावित एमआयडीसी करीता भेंडाळा परिसरातील १४ गावांनीही शेतजमिनी देण्यास नकार दिला आहे. तसेच चामोर्शी तालुक्यातील जयरामपूर परिसरातील आणखी १३ गावांच्या जमीन अधिग्रहणासंदर्भात शासनाने आदेश दिले आहे.
या धोरणाच्या निषेधार्थ यापूर्वी जीआरची होळी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन, धरणे आंदोलन तसेच निवेदन देऊन शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, शासन शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेण्यास तयार नाही.
तसेच, गेल्या तीन-चार वर्षांपासून जिल्ह्यात रानटी हत्तींचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला असून शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हत्तींच्या बंदोबस्तासाठी वारंवार मागणी करूनही प्रशासनाने ठोस उपाययोजना केलेल्या नाही, त्यांचा तातडीने व कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा.
या सर्व मागण्यांसाठी आणि जिल्ह्यातील सुपीक शेतजमिनींचे अधिग्रहण थांबवून पर्यायी जागांचा वापर करण्यात यावा, या मागणीसाठी ४ जून २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने ठिय्या आंदोलन आयोजित करण्यात आले असून या आंदोलनात शेतकरी बांधव, नागरिक, विविध पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे.
यावेळी पत्रकार परिषदेत दिवाकर निसार, सतीश विधाते, नेताजी गावतुरे, वसंत राऊत, मिलिंद खोब्रागडे, प्रशांत कोराम, श्रीनिवास ताटपल्लीवार, राजाराम ठाकरे, देवेंद्र ब्राह्मणवाडे, ढीवरु मेश्राम, प्रशिक बांबोडे, जीवन निकुरे, गिरीधर मेश्राम, अमोल सोरते, प्रमोद भोयर, रेवनाथ बाबनवाडे, वामन निसार, राजू मांदाळे, रुमाजी खेडेकर, परशुराम निकुरे, वासुदेव गेडाम, शांताराम निसार, तरकडू ठाकरे, अमोल गुरनुले, शोखाजी भोयर, घनश्याम निकुरे, विलास मोहुर्ले, दशरथ गुरनुले, मनोज खेडेकर, श्रावण जेंगठे, एकनाथ मांदाळे, भास्कर कांबळे, नदीम नाथानी, प्रतीक बारशिंगे, लक्ष्मण मेश्राम, गणेश मांदाळे, एकनाथ निकुरे, बुधाजी मेश्राम, लीलाधर गुरनुले, गुरुदास ठाकरे, दिलीप बाबणवाडे, पत्रू निसार, डोमाजी आवळे, विलास मांदाळे, घनश्याम निकुरे, शंकर मेश्राम, सुरेश गेडाम, डोमाजी आवळे, शांताराम निसार, सुनील मांदाळे, कुमोद खेडेकर, मारुती निकुरे, अनिकेत निकुरे, शुभम निसार, स्वप्निल जेंगठे, लंकेश खेडेकर, प्रल्हाद रायपुरे, नागेश जेंगठे, दिलीप बाबनवाडे, अंकुश खेडेकर, भारत देशमुख, संतोष निकोडे, भुवन मेश्राम, राजेंद्र मांदाळे, बुधाजी मेश्राम सह प्रस्तावित प्रकल्पग्रस्त गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

