
नितेश गट्टीवार
चामोर्शी,दि.१९ जूलै:
चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात एम.डी. मेडिसिन (फिजिशियन) तज्ज्ञ डॉक्टरांची पूर्णवेळ नियुक्ती करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांसह विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे. तालुक्यातील हजारो नागरिक उपचारासाठी या रुग्णालयावर अवलंबून आहेत. मात्र, तज्ज्ञ फिजिशियन उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांना उपचारासाठी गडचिरोली, चंद्रपूर किंवा खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत असून त्यामुळे त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

सध्या ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, परिचारिका तसेच इतर वैद्यकीय कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, ताप, श्वसनाचे आजार तसेच इतर गंभीर व दीर्घकालीन आजारांवर उपचार करण्यासाठी एम.डी. मेडिसिन तज्ज्ञ डॉक्टरांची नितांत आवश्यकता आहे. अशा तज्ज्ञ डॉक्टरांच्या अभावी अनेक रुग्णांना वेळेत उपचार मिळत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, चामोर्शी ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर होण्यासाठी नवीन इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून, नवीन रुग्णालय सुरू होण्यापूर्वीच रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी किमान एक एम.डी. मेडिसिन डॉक्टर तातडीने पूर्णवेळ नियुक्त करावा, अशी मागणी अधिक तीव्र झाली आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या तालुक्यातच दर्जेदार, तातडीची व विशेषज्ञ वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी आरोग्य विभागाने या मागणीची गंभीर दखल घेऊन त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
प्रतिक्रिया
रनेन मंडल
जिल्हा प्रमुख, बंगाली आघाडी (शिवसेना) तथा सदस्य, रुग्ण कल्याण समिती, ग्रामीण रुग्णालय चामोर्शी
“चामोर्शी तालुका हा गडचिरोली जिल्ह्यातील लोकसंख्येने मोठा तालुका आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. एम.डी. मेडिसिन तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. हा अत्यंत महत्त्वाचा आरोग्याचा प्रश्न असून शासनाने तातडीने पूर्णवेळ एम.डी. मेडिसिन डॉक्टरांची नियुक्ती करावी.”

