
अमित कत्तीवार | जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
वैरागड (गडचिरीली): खरीप हंगामातील धान रोवणीच्या कामासाठी मुसळधार पावसात दिवसभर शेतात राबणाऱ्या शेतमजुरांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची जाणीव ठेवत वैरागड येथील सामाजिक कार्यकर्त्या शीतलताई सोमनानी यांनी स्तुत्य उपक्रम राबविला. त्यांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन महिला व पुरुष शेतमजुरांना रेनकोटचे वाटप करत त्यांच्याप्रती सामाजिक बांधिलकी जपली. या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून स्वागत होत असून सर्व स्तरांतून कौतुक व्यक्त केले जात आहे.
सध्या गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामातील धान रोवणीची कामे वेगाने सुरू आहेत. सतत कोसळणाऱ्या पावसात तासन्तास चिखलात काम करताना शेतमजुरांना विविध आरोग्यविषयक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत त्यांच्या संरक्षणासाठी आणि आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने शीतलताई सोमनानी यांनी हा उपक्रम हाती घेतला.

यावेळी त्यांनी शेतमजुरांशी संवाद साधत, शेतकरी आणि शेतमजूर यांच्या अथक परिश्रमांवर ग्रामीण अर्थव्यवस्था उभी असल्याचे सांगितले. अन्नधान्य निर्मितीत त्यांचे योगदान अमूल्य असून त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच पावसाळ्यात आवश्यक ती खबरदारी घेऊन स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
अनपेक्षितपणे मिळालेल्या या मदतीमुळे शेतमजुरांनी समाधान व्यक्त करत शीतल सोमनानी यांचे आभार मानले. पावसात सलग काम करताना रेनकोटचा निश्चितच उपयोग होईल आणि त्यामुळे काम करताना मोठा दिलासा मिळेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
ग्रामीण भागात गरज ओळखून अशा प्रकारचे लोकहिताचे उपक्रम राबविणे हीच खरी समाजसेवा असल्याची प्रतिक्रिया अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केली. शेतकरी आणि शेतमजुरांच्या हितासाठी इतर सामाजिक संस्था व नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली. या उपक्रमामुळे परिसरात सामाजिक संवेदनशीलतेचा आणि माणुसकीचा सकारात्मक संदेश पोहोचला आहे.
या प्रसंगी शीतल सोमनानी यांच्यासह माजी सरपंच वैशाली डोंगरवार, रामदास डोंगरवार, सचिन उमरे, सुनील ताडाम, यशवंत रणदिवे, रवींद्र डोंगरवार, पंढरी ठाकूर आणि आकाश रणदिवे उपस्थित होते.

