
अमित कत्तीवार | विशेष जिल्हा प्रतिनिधी
एटापल्ली: जारावंडी परिसरात आज पुन्हा एकदा वाघाने बैलावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात वाघाच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आता पुन्हा झालेल्या हल्ल्यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण अधिकच वाढले आहे. यापूर्वीही या भागात वाघाने गायी व बैलांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत.
वन विभागाने यापूर्वी परिसरात लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये वाघ आणि तडस यांचा वावर स्पष्टपणे आढळून आला आहे. त्यामुळे जारावंडी परिसरात वाघाचा वावर असल्याचे अधोरेखित झाले असून, दिवसेंदिवस वन्यप्राण्यांकडून पाळीव जनावरांवरील हल्ल्यांच्या घटना वाढत असल्याने शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाचे कर्मचारी परिसरात गस्त घालत असून वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.

दरम्यान, नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, रात्रीच्या वेळी अनावश्यकपणे घराबाहेर पडणे टाळावे तसेच एकट्याने जंगल किंवा शेत परिसरात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. पाळीव जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत आणि वाघ किंवा अन्य वन्यप्राणी आढळल्यास त्याच्या जवळ जाण्याचा अथवा पाठलाग करण्याचा प्रयत्न न करता तात्काळ वन विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.

