
नितेश गट्टीवार न्यूज जागर गडचिरोली/चामोर्शी : शहरातील वाढती वाहनांची संख्या, वाहतुकीतील गोंधळ आणि वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर चामोर्शी शहरातील मुख्य व अपघातग्रस्त चौकांमध्ये सिसिटीव्ही कॅमेरे आणि ट्रॅफिक सिग्नल बसवण्यात यावेत, अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्ते सोनू वाळके यांनी केली आहे.
चामोर्शी नगरपंचायत हद्दीत अनेक महत्त्वाच्या चौकांमध्ये वाहतुकीचे कोणतेही नियोजन नसल्याने नागरिकांना मोठ्या धोक्याचा सामना करावा लागत आहे. विशेषतः शाळा, बाजारपेठ, बसस्थानक व गर्दीच्या परिसरात वाहनांचा वेग वाढत असून लहान-मोठे अपघात सातत्याने घडत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.
याबाबत बोलताना सोनू वाळके म्हणाले की, “अपघात झाल्यानंतर हालचाल करण्यापेक्षा अपघात टाळण्यासाठी आधुनिक सुरक्षा यंत्रणा उभारणे गरजेचे आहे. मुख्य चौकांमध्ये CCTV कॅमेरे आणि ट्रॅफिक सिग्नल बसविल्यास वाहतुकीवर नियंत्रण राहील, गुन्हेगारी घटनांवर नजर ठेवता येईल आणि नागरिकांची सुरक्षितता वाढेल.”

दरम्यान, शहरात अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईटची कमतरता, वाहतुकीचे नियम पाळले न जाणे आणि चौकांमध्ये नियंत्रण यंत्रणा नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. प्रशासनाने केवळ विकासाच्या घोषणा न करता नागरिकांच्या सुरक्षेलाही प्राधान्य द्यावे, अशी भावना सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.
सदर मागणीबाबत नगरपंचायत प्रशासन, पोलीस विभाग आणि संबंधित यंत्रणांनी संयुक्तपणे पाहणी करून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

