
जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय; हायवे सेफ्टी टास्क फोर्स, स्पीड कॅमेरे, ब्लॅक स्पॉट सुधारणा आणि गोल्डन अवर व्यवस्थेवर भर
गडचिरोली, दि. १६ जुलै :
गडचिरोली जिल्ह्यात वाढत असलेल्या रस्ते अपघातांचे प्रमाण, प्राणांतिक अपघात आणि अपघातप्रवण ठिकाणांची गंभीर दखल घेत सर्व संबंधित विभागांनी केवळ कागदोपत्री कामकाज न करता प्रत्यक्ष ऑनफिल्ड उतरून समन्वयाने काम करावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले.

प्रत्येक प्राणांतिक अपघातानंतर पोलीस, आरटीओ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्त पाहणी करून तातडीने सुधारणा उपाययोजना कराव्यात, तसेच ‘गोल्डन अवर’मध्ये अपघातग्रस्तांना त्वरित वैद्यकीय मदत मिळेल यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार रामदास मसराम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश, अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन गावंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता निता ठाकरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी जिल्ह्यासाठी तयार करण्यात आलेल्या सविस्तर ट्रॅफिक मॅनेजमेंट प्लॅनचे सादरीकरण केले. गेल्या पाच वर्षांत वाहनांची संख्या, विशेषतः मायनिंग ट्रक्समध्ये सुमारे ५० टक्के वाढ झाली असून एटापल्ली परिसरात दुचाकी वाहनांची संख्या पाचपट वाढल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सर्वाधिक अपघात होणारी १६ संवेदनशील ठिकाणे निश्चित करण्यात आली असून, प्राणांतिक अपघातांमध्ये किमान २० टक्के आणि एकूण अपघातांमध्ये ५ टक्के घट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी मद्यधुंद अवस्थेतील वाहनचालकांवर तसेच मोटार वाहन कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

