
मनीष दुर्गे, तालुका कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट ) यांचे प्रशासनाला निवेदन
अमित कत्तीवार, विशेष जिल्हा प्रतिनिधी
एटापल्ली : तालुक्यातील जारावंडी व सेवारी ग्रामपंचायतींमध्ये कथित प्रशासकीय अनियमितता, आर्थिक गैरव्यवहार, विकासकामांतील त्रुटी आणि नियमित ग्रामसेवकाच्या अनुपस्थितीमुळे नागरिकांना होत असलेल्या गैरसोयींची स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) चे तालुका कार्याध्यक्ष मनीष दुर्गे यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या निवेदनातून केली आहे.

निवेदनात दोन्ही ग्रामपंचायतींमधील मागील काही वर्षांतील आर्थिक व्यवहार, विकासनिधीचा वापर, विविध विकासकामांची अंमलबजावणी तसेच तत्कालीन ग्रामसेवकांच्या कार्यकाळातील व्यवहारांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित आर्थिक व्यवहारांवर आवश्यक नियंत्रण ठेवून दोषी आढळणाऱ्या अधिकारी, कर्मचारी किंवा संबंधित व्यक्तींवर कोणतीही दया न दाखविता कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, ग्रामस्थांनी अनेक वेळा तक्रारी, निवेदने व स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी नाराजी वाढत असून शासनावरील विश्वास कमी होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यासोबतच जारावंडी व सेवारी ग्रामपंचायतींमध्ये नियमित ग्रामसेवकांची तातडीने नियुक्ती करून प्रलंबित कामांना गती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. चौकशीचा अहवाल निश्चित कालमर्यादेत सादर करून त्यानुसार त्वरित कारवाई करण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
निवेदनात प्रशासनाला स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, जनतेच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास लोकशाही मार्गाने व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील. नागरिकांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण करणे ही शासनाची घटनात्मक जबाबदारी असल्याने या प्रकरणाची तातडीने दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी गडचिरोली, विभागीय आयुक्त नागपूर, अहेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार, संबंधित ग्रामपंचायत सदस्य तसेच जारावंडी व सेवारी येथील ग्रामस्थांना पाठविण्यात आल्या आहेत.

