
जिल्हा माहिती कार्यालयात सोशल मीडिया इन्फ्लुन्सर्ससोबत सकारात्मक संवाद; शासन–डिजिटल माध्यमांमध्ये समन्वय वाढविण्यावर भर
गडचिरोली, दि. १५ जुलै : गडचिरोली जिल्ह्यातील विकासकामे, लोककल्याणकारी उपक्रम आणि सकारात्मक बदलांची माहिती अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्हा माहिती कार्यालय, गडचिरोली येथे आज सोशल मीडिया इन्फ्लुन्सर्ससोबत संवाद व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
यावेळी शासन आणि सोशल मीडिया निर्माते यांच्यात समन्वय वाढवून गडचिरोलीची सकारात्मक ओळख राज्य व देशपातळीवर अधिक व्यापक स्तरावर पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांनी उपस्थित सोशल मीडिया इन्फ्लुन्सर्सशी संवाद साधत शासनाच्या विकासकामांची, लोककल्याणकारी योजनांची आणि जिल्ह्यातील विविध सकारात्मक उपक्रमांची माहिती समाजमाध्यमांच्या माध्यमातून वस्तुनिष्ठ, विश्वासार्ह आणि प्रभावी पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. जिल्ह्याच्या विकासात्मक वाटचालीत सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम असून त्याचा जबाबदारीने वापर होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
बैठकीत गडचिरोली जिल्ह्यात विविध क्षेत्रांत होत असलेले सकारात्मक बदल, पायाभूत सुविधा, पर्यटन, आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास, कृषी, उद्योग तसेच आदिवासी विकासाशी संबंधित उपक्रमांचा प्रभावी प्रचार-प्रसार करण्यासाठी सोशल मीडियाची भूमिका महत्त्वाची असल्याचे अधोरेखित करण्यात आले.
यावेळी सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर, माहिती प्रसारित करण्यापूर्वी तथ्य पडताळणी करणे, अप्रमाणित अथवा दिशाभूल करणाऱ्या माहितीपासून दूर राहणे तसेच समाजात सकारात्मक आणि विधायक संदेश पोहोचविण्यावर विशेष भर देण्यात आला.
शासनाच्या विविध जनहिताच्या योजना, विकासात्मक उपक्रम, यशोगाथा आणि लोककल्याणकारी कार्यक्रमांची व्यापक प्रसिद्धी करण्यासाठी सोशल मीडिया इन्फ्लुन्सर्सचे सक्रिय सहकार्य अपेक्षित असल्याचे यावेळी सांगण्यात आले. विविध शासकीय जनजागृती मोहिमा आणि अभियानांना डिजिटल माध्यमातून प्रभावी पाठबळ देण्यासाठी सातत्याने समन्वय ठेवण्याबाबतही चर्चा झाली.
‘अनटॅप्प्ड गडचिरोली’ या संकल्पनेअंतर्गत जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक वारसा, जैवविविधता, स्थानिक संस्कृती आणि पर्यटन क्षमतेचा प्रभावी प्रचार-प्रसार सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यासाठी संयुक्तपणे प्रयत्न करण्याचे ठरले.
तसेच, स्थानिक स्तरावरील दर्जेदार आणि सकारात्मक डिजिटल आशय निर्मितीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी विविध शासकीय जनजागृती मोहिमा आणि जाहिरातींच्या माध्यमातून सोशल मीडिया इन्फ्लुन्सर्सना आर्थिक व इतर अनुषंगिक सहकार्य करण्याच्या शक्यतांवरही सकारात्मक चर्चा करण्यात आली.
बैठकीत सहभागी सोशल मीडिया इन्फ्लुन्सर्सनी विविध विधायक सूचना मांडत जिल्ह्याच्या विकासात्मक वाटचालीत सक्रिय योगदान देण्याची तयारी दर्शविली. भविष्यात प्रशासन आणि सोशल मीडिया निर्माते यांच्यात अधिक सशक्त समन्वय निर्माण करून गडचिरोलीची सकारात्मक, प्रगत आणि विकासाभिमुख ओळख अधिक व्यापक स्तरावर पोहोचविण्यासाठी संयुक्तपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी प्राची सातपुते, राहुल रोहनकर, पंकज नंदगिरीवार, विवेक मेटे, मोहित मसराम, हितेश वाघाडे, मंगेश मेश्राम, स्वेतेश मडावी, शुभम पारवेकर, अभिषेक गंडाटे, साक्षी उईके, प्रणय भजभुजे, सौरभ भांडेकर, आचल मडावी, निर्जल उराडे, अनेक सडमेक आदी जिल्ह्यातील बहुसंख्य सोशल मीडिया इन्फ्लुन्सर उपस्थित होते.

