
युवाशक्ती दुर्गोत्सव तथा महात्मा ज्योतिबा फुले दुर्गा मंडळ एटापल्ली चे स्तुत्य उपक्रम

एटापल्ली : नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक उत्सवाला सामाजिक सेवेची जोड देत युवाशक्ती दुर्गोत्सव तथा महात्मा ज्योतिबा फुले दुर्गा मंडळ, शिवाजी चौक, एटापल्ली यांच्या वतीने भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण ६० रुग्णांची विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या.
शिबिराचे उद्घाटन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देणे आणि आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.

या शिबिरासाठी ग्रामीण रुग्णालय, एटापल्ली येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. उईके सर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चौधरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शिबिरामध्ये विविध प्रकारच्या रक्त तपासण्या, रक्तदाब, रक्तातील साखर, किडनी फंक्शन टेस्ट (KFT), लिव्हर फंक्शन टेस्ट (LFT) आणि नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच पात्र लाभार्थ्यांसाठी आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली.
ग्रामीण भागातील नागरिकांना आवश्यक आरोग्य तपासण्या एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने या उपक्रमाला महत्त्व प्राप्त झाले. धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यविषयक उपक्रम राबविण्याचा मंडळाचा प्रयत्न या शिबिरातून दिसून आला.
शिबिराच्या यशस्वितेसाठी मंडळाचे सल्लागार श्रीकांत कोकुलवार, अध्यक्ष हेमंत मोहुर्ले, विजय अतकमवार, शैलेश वरखडे, पवन नीलीवार, डॉ. रामचंद्र आसुटकर, महिला पदाधिकारी उषाताई ठाकरे, पौर्णिमाताई श्रीरामवार, सरिताताई राजकोंडावार, मधुताई पुण्यमूर्तीवार आणि सौजन्या अतकमवार यांनी सहकार्य केले. तसेच आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले.
सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यसेवेचा हा उपक्रम राबविल्याबद्दल मंडळाच्या कार्याचे परिसरात महत्त्व अधोरेखित झाले.

