
आमदार रामदास मसराम यांनी आश्रमशाळेला भेट देत व्यक्त केले तीव्र दुःख; शोकाकुल कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त

नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
(कुरखेडा) | दिनांक १४ ऑक्टोंबर:

गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील सोनसरी येथील आदिवासी माध्यमिक आश्रमशाळेत शिकणाऱ्या १४ वर्षीय कु. रानू कृष्णा हलामी या विद्यार्थिनीच्या दुर्दैवी निधनाच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अल्पवयीन विद्यार्थिनीच्या निधनाची ही घटना अत्यंत वेदनादायी असून, मन हेलावून टाकणारी आहे.
या दुःखद घटनेची माहिती मिळताच आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी सोनसरी येथील आदिवासी माध्यमिक आश्रमशाळेला भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी त्यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले.
या कठीण प्रसंगी दिवंगत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या. रानू हलामी हिच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून निघणे अशक्य असून, या दुःखद प्रसंगातून सावरण्याचे बळ तिच्या कुटुंबीयांना मिळो, अशी प्रार्थना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी मान्यवरांची उपस्थिती
या भेटीदरम्यान माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा काँग्रेस कमिटीचे कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन पाटील नाट, काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत हरडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर तुलावी, माजी सभापती गिरीधर तीतराम, सिराज पठाण, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक मिसार, दादाजी प्रधान, माजी उपसरपंच झुनूकलाल चौधरी, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या वनिता नैताम व वर्षा किरंगे, ग्रामपंचायत सदस्य मनोहर दहिकर, प्रकाश गोटा, मोहन प्रधान तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य योगेश हलामी उपस्थित होते.
विद्यार्थिनीच्या अकाली निधनाने परिसरात शोककळा पसरली असून, दिवंगत कु. रानू कृष्णा हलामी हिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. तसेच शोकाकुल कुटुंबीयांच्या दुःखात सर्वजण सहभागी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

