
अहेरीच्या ऐतिहासिक दसरा उत्सवाला मीना बाजाराची रंगत; महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगडमधून नागरिकांची उपस्थिती.

अमोल मारकवार | तालुका प्रतिनिधी
अहेरी:- अहेरी येथील प्रसिद्ध दसरा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हॉकी ग्राउंड, अहेरी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेल्या माऊली एकता मीना बाजाराचे उद्घाटन युवानेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या मीना बाजारामुळे दसरा उत्सवाच्या आनंदात आणखी भर पडली असून नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अहेरीचा दसरा उत्सव हा परिसरातील एक प्रसिद्ध आणि ऐतिहासिक उत्सव म्हणून ओळखला जातो. या उत्सवाला तब्बल २५० वर्षांची परंपरा लाभली असल्याचे सांगितले जाते. अनेक वर्षांपासून चालत आलेल्या या परंपरेमुळे अहेरीच्या दसरा उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या उत्सवात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रासह शेजारील तेलंगणा आणि छत्तीसगड या राज्यांमधूनही मोठ्या संख्येने नागरिक अहेरी येथे येतात.
दसरा उत्सवाच्या निमित्ताने हॉकी ग्राउंड येथे भरविण्यात येणारा मीना बाजार नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरतो. बाजाराच्या माध्यमातून नागरिकांना मनोरंजनासोबतच विविध वस्तूंची खरेदी करण्याची संधी मिळते. दरवर्षीप्रमाणे यंदाही माऊली एकता मीना बाजारामुळे अहेरीच्या दसरा उत्सवात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.या उद्घाटनप्रसंगी प्रवीणराव बाबा, वैभव सोमकुवर, भाजपचे तालुकाध्यक्ष विकास तोडसाम तसेच भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
अहेरीच्या ऐतिहासिक दसरा उत्सवाची परंपरा पुढील पिढीपर्यंत जपली जावी, तसेच या उत्सवाच्या माध्यमातून विविध राज्यांतील नागरिकांमध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक सलोखा वृद्धिंगत व्हावा, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

