
न्यूज जागर…
मूल शहरातील डांबरी हायवेच्या बाजूचे खोदकाम निकृष्ट; अपघातांना प्रशासन जबाबदार – दत्तात्रय समर्थ (इंटक)
मूल (प्रतिनिधी): मूल शहरातून जाणाऱ्या डांबरी राष्ट्रीय/राज्य महामार्गाच्या (हायवे) बाजूला सुरू असलेल्या खोदकामाच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याचा गंभीर आरोप इंटकचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांनी केला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना खोदकाम करून त्याच उपसा केलेल्या मातीचा भराव टाकला जात असून आवश्यक त्या प्रमाणात मुरूम किंवा खडीचा वापर केला जात नसल्याने संपूर्ण कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
समर्थ यांनी सांगितले की, हायवेवर दररोज हजारो लहान-मोठी वाहने धावत असतात. मात्र रस्त्यालगत खोदलेले खड्डे, त्यामध्ये टाकलेली सैल माती आणि निकृष्ट भरावामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसामुळे ही माती वाहून जात असल्याने रस्त्याच्या कडेला मोठे खड्डे तयार होत आहेत. त्यामुळे दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनांनाही अपघाताचा धोका वाढला असून अनेक किरकोळ अपघात घडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.

या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित ठेकेदार, अभियंते व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी दत्तात्रय समर्थ यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे. तसेच कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी तांत्रिक समिती नेमून प्रत्यक्ष पाहणी करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली.
“शासनाचा निधी खर्च करूनही नागरिकांना दर्जेदार रस्ता मिळत नसेल, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. निकृष्ट कामामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असून याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे,” असे दत्तात्रय समर्थ यांनी स्पष्ट केले.
प्रशासनाने त्वरित कारवाई करून निकृष्ट काम थांबवावे, रस्त्याच्या बाजूचा भराव नियमानुसार मुरूम व खडीचा वापर करून पुन्हा करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी. अन्यथा इंटकच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही जिल्हाध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांनी दिला.

