
गडचिरोली | प्रतिनिधी
धानोरा तालुक्यातील राजोली रेती घाटावर झालेल्या युवकाच्या निर्घृण हत्याकांडामुळे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाचा तातडीने छडा लावून खऱ्या आरोपींना अटक करावी, तसेच कोणालाही पाठीशी न घालता निष्पक्ष, पारदर्शक आणि जलदगतीने तपास करावा, अशी जोरदार मागणी भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी केली आहे.
डॉ. होळी यांनी म्हटले आहे की, रेती घाटाचा मालक, त्याचे भागीदार, घटनेच्या वेळी उपस्थित असलेले कर्मचारी, सुरक्षा रक्षक, वाहनचालक आणि संबंधित सर्व व्यक्तींची सखोल चौकशी करण्यात यावी. घटनेच्या वेळी नेमके कोण उपस्थित होते, त्यांनी पोलिसांना तात्काळ माहिती दिली का, तसेच घटनास्थळावरील पुरावे सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी पार पाडली का, याचीही चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय, घटनास्थळी असलेले सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत होते का, त्यातील सर्व फुटेज तात्काळ जप्त करून फॉरेन्सिक तपासणी करण्यात यावी. त्या फुटेजच्या आधारे आरोपींसह त्यांना मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
डॉ. होळी यांनी तपास प्रक्रियेबाबत जनतेमध्ये निर्माण झालेल्या शंकांकडेही लक्ष वेधले. रेती घाटाशी संबंधित कोणाचीही मिलीभगत होती का, तपासात कोणत्याही स्तरावर निष्काळजीपणा किंवा अनुचित हस्तक्षेप झाला का, याचाही निष्पक्ष तपास व्हावा. कोणालाही क्लीन चिट देण्यापूर्वी सर्व बाबींची कसून पडताळणी करणे आवश्यक आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
मृत युवकाच्या कुटुंबाला तातडीने न्याय मिळावा, दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि कोणत्याही दबावाशिवाय सत्य जनतेसमोर यावे, अशी मागणी करत प्रशासनाने त्वरित ठोस कारवाई केली नाही, तर भाजपा आदिवासी मोर्चाच्या वतीने तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल. त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी दिला.

