
जिल्हा प्रतिनिधी |गडचिरोली
राज्य सरकारच्या वीज ग्राहकांसाठी राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटर योजनेविरोधात काँग्रेसचे युवा नेते महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. “हे स्मार्ट मीटर नसून सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर डाका टाकणारे ‘जेब कटर’ आहेत,” अशा शब्दांत त्यांनी सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली.
महागाई, वाढती बेरोजगारी आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिक आधीच आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत स्मार्ट मीटरच्या माध्यमातून नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ब्राह्मणवाडे यांनी केला.

त्यांनी सांगितले की, ग्रामीण भागात वारंवार वीज खंडित होणे, अपुरी वीज सेवा आणि शेतकरी, विद्यार्थी व मध्यमवर्गीयांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. अशा वेळी प्रीपेड व स्मार्ट मीटर सक्तीने लावण्याचा निर्णय जनतेच्या हिताविरोधात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्मार्ट मीटर योजनेबाबत राज्यभरातून नागरिक आणि विविध राजकीय पक्षांकडून विरोधाची भावना व्यक्त होत असून, सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
निर्णय मागे न घेतल्यास जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिला.
“जनतेच्या हिताच्या विरोधात असलेला कोणताही निर्णय आम्ही खपवून घेणार नाही. सर्वसामान्यांच्या खिशावर डाका टाकणाऱ्या स्मार्ट मीटर योजनेविरोधात काँग्रेस जनतेसोबत ठामपणे उभी राहील,” असेही त्यांनी यावेळी सांगितले.

