
लाभार्थ्यांच्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले
चामोर्शी | प्रतिनिधी
संजय गांधी राष्ट्रीय निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, विधवा, दिव्यांग, निराधार महिला व इतर पात्र लाभार्थ्यांना नियमित व वेळेत पेन्शन मिळावी, तालुकास्तरावर ‘सिंगल विंडो’ सुविधा सुरू करण्यात यावी, गावागावांत विशेष शिबिरे आयोजित करावीत तसेच प्रलंबित पेन्शनचे हप्ते तातडीने वितरित करावेत, अशा विविध मागण्यांसाठी चामोर्शी प्रेस क्लबच्या वतीने तहसीलदारांना सविस्तर निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, संजय गांधी राष्ट्रीय निराधार अनुदान योजनेतील लाभार्थी हे आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल घटक आहेत. वेळेवर पेन्शन न मिळाल्यामुळे त्यांच्या दैनंदिन उदरनिर्वाहासह औषधोपचार व इतर अत्यावश्यक गरजांवर गंभीर परिणाम होत आहे. अनेक लाभार्थ्यांना महिनोनमहिने पेन्शनची प्रतीक्षा करावी लागत असल्याने त्यांची आर्थिक अडचण अधिकच वाढत आहे.
तसेच केवायसी (KYC), डीबीटी (DBT), आधार पडताळणी, बँक खाते अद्ययावत करणे आणि इतर आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी लाभार्थ्यांना वारंवार तहसील कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील वृद्ध, विधवा व दिव्यांग लाभार्थ्यांना प्रवासाचा खर्च आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याने प्रशासनाने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रेस क्लबने निवेदनाद्वारे दर महिन्याच्या १ ते ५ तारखेच्या आत नियमित पेन्शन जमा करणे, थकीत हप्ते तातडीने अदा करणे, तहसील कार्यालयात ‘सिंगल विंडो सिस्टीम’ सुरू करणे, गावागावांत विशेष शिबिरे आयोजित करणे, प्रलंबित अर्जांचा कालमर्यादेत निपटारा करणे, निधी वेळेत उपलब्ध करून नियमित लाभ सुनिश्चित करणे तसेच स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष सुरू करणे या प्रमुख मागण्या केल्या आहेत.
निराधार लाभार्थी हे समाजातील सर्वाधिक गरजू आणि वंचित घटक असल्याने त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ कोणत्याही विलंबाशिवाय मिळणे ही प्रशासनाची नैतिक व कायदेशीर जबाबदारी असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या सर्व मागण्यांवर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा चामोर्शी प्रेस क्लबने व्यक्त केली.
निवेदन देताना चामोर्शी प्रेस क्लबचे अध्यक्ष विनोद खोबे, सचिव अरुण गव्हारे, कार्याध्यक्ष नितेश गट्टीवार, उपाध्यक्ष श्रावण वाकोडे व धनराज वासेकर, कोषाध्यक्ष मारोती बारसागडे, सहसचिव हस्ते भगत, पुंडलिक भांडेकर, प्रफुल्ल कोटांगले यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

