
हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार, मोठ्या आंदोलनाचा इशारा
गडचिरोली,दि.१६ जूलै:
गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या उद्योगांना प्रोत्साहन देण्याच्या नावाखाली स्थानिकांच्या हक्कांवर गदा येत असून, जिल्ह्याची योजनाबद्ध लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते तथा विधान परिषदेचे माजी विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला. “गडचिरोली आज ‘सोने की चिडिया’ झाला आहे, मात्र तो येथील जनतेसाठी नाही तर केवळ सत्ताधाऱ्यांसाठी,” अशी टीका त्यांनी केली.

गुरुवारी संध्याकाळी गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. १८ जुलै रोजी नागपूर येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात होणाऱ्या ‘रामरक्षा आंदोलन’ संदर्भात माहिती देण्यासाठी तसेच पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दानवे गडचिरोली दौऱ्यावर आले होते.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, मोठमोठ्या कंपन्या जिल्ह्यात येऊन मनमानी कारभार करत आहेत. आदिवासींच्या जमिनी विविध मार्गांनी हस्तगत केल्या जात असून, स्थानिकांना न्याय आणि संरक्षण मिळत नाही. जिल्ह्याच्या विकासाच्या नावाखाली नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
गडचिरोलीतील विविध प्रलंबित प्रश्नांवर शिवसेना येत्या हिवाळी अधिवेशनात जोरदार आवाज उठवणार असून, गरज पडल्यास मोठे जनआंदोलन आणि मोर्चा काढला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
गडचिरोलीतील प्रस्तावित विमानतळासाठी शेतजमिनी संपादित करण्यास होत असलेल्या विरोधाबाबत भूमिका स्पष्ट करताना दानवे म्हणाले, “जिल्ह्यात अजूनही अनेक रस्त्यांची दुरवस्था आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याऐवजी विमानतळ उभारण्याची घाई का केली जात आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राज्यात अनेक जिल्ह्यांतील विमानतळ वापराअभावी बंद असल्याचा उल्लेख करत, विमानतळाच्या नावाखाली आधी उद्योगपती परिसरातील जमिनी विकत घेतात आणि नंतर सरकार त्याच जमिनी वाढीव दराने खरेदी करते, अशी कार्यपद्धती सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पत्रपरिषदेला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पवन गेडाम यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पत्रकार परिषदेनंतर अंबादास दानवे यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधून आगामी आंदोलनाबाबत मार्गदर्शन केले.

