
जिल्हा प्रतिनिधी |नितेश गट्टीवार
गडचिरोली,दि.१९ जूलै : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जनसेवेचा संकल्प म्हणून गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील नागरिकांसाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. नागरिकांच्या विविध शासकीय कामांचे एकाच छताखाली, जलद व प्रभावी निराकरण करण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
हे शिबिर ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले असून, बुधवार, २२ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता सुमानंद मंगल कार्यालय, आरमोरी रोड, गडचिरोली येथे पार पडणार आहे.

शिबिरामध्ये महसूल विभागासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित राहून नागरिकांच्या प्रलंबित कामांचा जागेवर निपटारा करणार आहेत. सातबारा उतारा, उत्पन्न, जात, रहिवासी आदी प्रमाणपत्रे, गावठाण स्वामित्व सनद, विविध शासकीय योजनांची माहिती व नोंदणी, महिला शेतकरी प्रमाणपत्र, महत्त्वाच्या महसूल सेवा तसेच तक्रारींचे निराकरण अशा अनेक सुविधा या शिबिरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
नागरिकांनी आधार कार्ड, रेशन कार्ड, सातबारा उतारा तसेच संबंधित कागदपत्रांच्या मूळ प्रती व छायाप्रती सोबत आणाव्यात, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
आमदार डॉ. मिलिंद रामजी नरोटे यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील सर्व नागरिकांनी या शिबिरात मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासकीय सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

