
जिल्हा प्रतिनिधी| नितेश गट्टीवार
गडचिरोली, दि.१८ जूलै:
गडचिरोली शहरातील चांदाळा रोड परिसरातील आदिवासी गोटूल भूमीचा तब्बल ३५ वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे गोटूल भवनासाठी सुमारे १ हेक्टर जागेला मंजुरी मिळाली असून, वनविभागाने १०० बाय १०० मीटर जागेचे सीमांकन करून सीमा निश्चितीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

गोटूल समितीच्या नव्या कार्यकारिणीने आमदार डॉ. नरोटे यांच्या नेतृत्वाखाली वन हक्क समिती, वनविभाग, नगर परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होत गोटूल भूमीसाठी जागा मंजूर करण्यात आली. यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या गोटूल भवनाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
सीमांकन व सीमा निश्चिती कार्यक्रम आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली आणि शुभहस्ते संपन्न झाला. या वेळी गडचिरोली नगर परिषद सभापती हर्षल गेडाम, आदिवासी गोटूल समितीचे अध्यक्ष नंदुभाऊ नरोटे, सचिव देवराव अलाम, कोषाध्यक्ष अमरसिंग गेडाम, उपमुख्य कार्यपालन अधिकारी फरेंद्र कुतीरकर, काँग्रेस आदिवासी जिल्हाध्यक्ष माधव गावळ, एम्प्लॉईज फेडरेशनचे जिल्हा सचिव सदानंद ताराम, काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजित कोवासे, आनंद कंगाले, उमेश उईके, कुणाल कोवे, बादल मडावी, सुमित कुमरे, विलास नरोटे, श्याम गावडे, दिनेश कुमरे, पंकज गुड्डेवार, रजनीकांत मोटघरे तसेच विविध सामाजिक, राजकीय आणि आदिवासी संघटनांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी गोटूल ही आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक ओळखीचे आणि परंपरेचे महत्त्वपूर्ण केंद्र असल्याचे सांगत, या जागेच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले. भविष्यात या ठिकाणी भव्य गोटूल भवन उभारण्यात येणार असून, त्याद्वारे सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांना नवी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
तब्बल ३५ वर्षांच्या संघर्षानंतर गोटूल भूमीचा प्रश्न निकाली निघाल्याने आदिवासी समाजात आनंदाचे वातावरण आहे. हा केवळ सीमांकनाचा कार्यक्रम नसून आदिवासी अस्मितेचा सन्मान, दीर्घ संघर्षाचा विजय आणि गोटूल संस्कृतीच्या जतनासाठीचा ऐतिहासिक टप्पा असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

