
नितेश गट्टीवार न्यूज जागर गडचिरोली, दि. २६ मे :
हवामान विभाग, प्रादेशिक केंद्र नागपूर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी उष्ण लहर ते तीव्र उष्ण लहर निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दि. २६ ते २७ मे दरम्यान जिल्ह्यात काही भागांत उष्ण लहरसोबतच उष्ण रात्रींचीही परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत करण्यात आले आहे.
उन्हाळ्यात तापमानात सरासरीपेक्षा अधिक वाढ होत असल्याने मानवी शरीरावर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. दीर्घकाळ तीव्र उष्णतेच्या संपर्कात राहिल्यास उष्माघाताचा धोका निर्माण होऊन गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. वेळेत उपचार न मिळाल्यास जीवितहानी होण्याचीही शक्यता असल्याने नागरिकांनी उष्माघाताची लक्षणे ओळखून योग्य वेळी दक्षता घेणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

प्रशासनाने नागरिकांना पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला दिला असून तहान लागली नसली तरी नियमित अंतराने पाणी पिण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री, टोपी किंवा ओल्या कपड्याचा वापर करावा. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. हलकी, सैल व सुताची कपडे वापरावीत तसेच प्रवासादरम्यान पिण्याचे पाणी सोबत ठेवावे, असेही सांगण्यात आले आहे.
उन्हात काम करणाऱ्या मजुरांनी किंवा नागरिकांनी मध्ये-मध्ये विश्रांती घ्यावी, शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी ORS, लिंबूपाणी, ताक, लस्सी, कैरीचे पन्हे यांसारख्या पेयांचा वापर करावा. अशक्तपणा, चक्कर येणे, डोकेदुखी, जास्त घाम येणे यांसारखी लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. पाळीव प्राणी व गुरांना सावलीत ठेवून पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे. घर थंड राहण्यासाठी पडदे, शटर, सनशेड यांचा वापर करावा तसेच रात्रीच्या वेळी खिडक्या उघड्या ठेवाव्यात, असेही प्रशासनाने म्हटले आहे.
त्याचप्रमाणे नागरिकांनी दारू, चहा, कॉफी व कार्बोनेटेड थंड पेयांचे सेवन टाळावे. जड व गडद रंगाचे कपडे वापरू नयेत. अतिश्रमाची कामे शक्यतो टाळावीत तसेच लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद वाहनात ठेवू नये, असेही सूचित करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष देऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि उष्मालाटेपासून स्वतःचा व कुटुंबाचा बचाव करावा, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.

