
श्री . नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
नागपूर–देवरी–रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील कुरखेडा–कोरची–बोटेकसा–छत्तीसगड मार्गातील बेळगाव घाट परिसरात रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था झाल्याने वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे महिन्यातून दोन ते तीन वेळा मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प होत असल्याचे चित्र आहे.
रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कडेला मोठमोठे खड्डे पडले असून, जड वाहतुकीतील एखादा ट्रक बिघडल्यास इतर वाहनांना जाण्यासाठी जागाच उरत नाही. परिणामी, चारचाकी व जड वाहनांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही वेळा एखादा ट्रक रस्त्यात अडकल्यास चार ते सहा तास, तर कधी दिवसभर वाहतूक पूर्णपणे बंद राहते.

या परिस्थितीचा सर्वाधिक फटका रुग्णवाहिकांना व राज्य परिवहन महामंडळाच्या बसांना बसत आहे. कोरची येथील रुग्णालयातून जाणाऱ्या रुग्णांना चिचगड–नवेगाव बांध मार्गे वळसा घ्यावा लागत असल्याने रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सुदैवाने अद्याप जीवितहानी झाली नसली तरी भविष्यात गंभीर दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पत्र देऊन खड्डे बुजवण्याचे आदेश दिले असतानाही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
याशिवाय, नागपूर–देवरी–रायपूर मार्गावरील जड वाहतूक कर चुकवण्यासाठी राजनांदगावमार्गे वळवून बोटेकसा–कोरची–कुरखेडा मार्गे चालवली जात असल्याचा आरोप आहे. राज्य परिवहन विभागाने ओव्हरलोड वाहनांवर कठोर कारवाई केल्यास अनधिकृत वाहतूक रोखता येईल, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
सुरजागड लोह प्रकल्पातील खनिज वाहतूक करणारे ट्रक मोठ्या प्रमाणावर याच मार्गाने धावत असल्याने रस्त्यांची अधिकच दुरवस्था झाली आहे. परिणामी, चारचाकी व दुचाकी वाहनचालकांसाठी हा प्रवास धोकादायक ठरत असून, नागरिक अक्षरशः जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत.
तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
बेळगाव घाटातील रस्त्याच्या कडेला पडलेले खड्डे व साईड बंब तातडीने भरून रस्ता सुरळीत करावा, तसेच वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरूपी सोडवावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व प्रवासी करत आहेत.

