
नितेश गट्टीवार गडचिरोली/कुरखेडा दि.१३ मे:
कुरखेडा येथे अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या रोड व ब्रिज पुलाच्या कामांची आज दुपारी २ वाजता आमदार रामदास मसराम यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या कामांबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी प्राप्त होत असल्याने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह काम करणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधींना घटनास्थळी बोलावून कामाचा आढावा घेतला.
यापूर्वीही आमदार रामदास मसराम यांनी अनेक वेळा या कामांच्या संदर्भात भेट देऊन कामाची प्रगती तपासली होती. मात्र, अद्यापही काही ठिकाणी कामाची गती मंद असल्याचे निदर्शनास आले. विशेषतः पावसाळा तोंडावर असल्याने कुरखेडा शहरातील नागरिक तसेच ग्रामीण भागातून ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

यावेळी त्यांनी संबंधित कंपनी व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ योग्य नियोजन करून कामे जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. रस्त्यावर वाहतूक सुरळीत राहावी, नागरिकांना गैरसोय होऊ नये तसेच पावसाळ्यात अपघाताची शक्यता टाळण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना त्वरित करण्यात याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.
कामामध्ये कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन दर्जेदार काम करावे, असेही आमदार रामदास मसराम यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकरजी तुलावी,काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष जयंत हरडे, माजी सभापती परसरामजी टिकले माजी सभापती गिरीधर तितराम, माजी उपसभापती श्रीराम दुगा,धनपाल मिसार सर, नगरसेवक आशिष काळे,माजी नगरसेवक उस्मान पठाण, भावेश मुगणकर, सिराज पठाण, राकेश चव्हाण, कार्यकारी अभियंता प्रफुल केळकर, कनिष्ठ अभियंता अमित रामटेके, राजलक्ष्मी प्रोजेक्ट डायरेक्टर पराग केसरकर, वरुण देव शर्मा, भैसारे, स्वामी ,उपस्थित होते. तसेच कर्मचारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

