
नितेश गट्टीवार गडचिरोली:
जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील आरोग्य सेवेच्या गंभीर त्रुटींचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वीज पुरवठा खंडित झाल्याने आणि बॅकअपसाठी असलेले इन्व्हर्टरही बंद पडल्याने व्हेंटिलेटर थांबले, परिणामी एका नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक आरोप पालकांनी केला आहे. या घटनेमुळे रुग्णालयातील गैरव्यवस्था आणि निष्काळजीपणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
नेमकी घटना काय?

कुरखेडा तालुक्यातील गेवर्धा येथील संजना संदीप कुमरे (२३) यांना प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर ११ मे रोजी गडचिरोलीच्या महिला व बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुपारी दोनच्या सुमारास त्यांनी एका मुलाला जन्म दिला. मात्र, जन्मानंतर काही तासांतच बाळाची प्रकृती खालावू लागली.
संध्याकाळी साडेसातच्या सुमारास डॉक्टरांनी बाळाची स्थिती गंभीर असल्याचे सांगत त्याला तातडीने चंद्रपूर येथे हलवण्याचा सल्ला दिला.
रुग्णवाहिकेसाठी ताटकळले नातेवाईक
जिल्हा मुख्यालयाचे रुग्णालय असूनही वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने नातेवाईकांची मोठी धावपळ झाली. पालकांनी ‘१०८’ आपत्कालीन सेवेशी संपर्क साधला असता, ‘रुग्णवाहिका पोहोचण्यास किमान दोन तास लागतील’ असे उत्तर त्यांना मिळाले. तब्बल दीड तास प्रतीक्षा करूनही वाहन न मिळाल्याने अखेर बाळाला रुग्णालयातीलच नवजात शिशू अतिदक्षता विभागात (SNCU) दाखल करण्यात आले.
वीज गुल आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा
उपचार सुरू असतानाच रुग्णालयातील वीज पुरवठा खंडित झाला. धक्कादायक बाब म्हणजे, तब्बल दीड तास वीज नव्हती आणि बॅकअपसाठी असलेले इन्व्हर्टरही निकामी ठरले. यामुळे व्हेंटिलेटर बंद पडले आणि ऑक्सिजन अभावी बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला, असा थेट आरोप कुमरे कुटुंबियांनी केला आहे.
“उपचारात कोणतीही हलगर्जी नाही” – रुग्णालय प्रशासन
या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ. प्रशांत पेंदाम यांनी उपचारात हलगर्जी झाल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. “बाळाचा जन्म मुदतपूर्व (Premature) झाल्याने त्याचे वजन कमी होते आणि प्रकृती अत्यंत नाजूक होती. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले, उपचारात कोणतीही कसर सोडली नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्य मुद्दे:
दीड तास वीज पुरवठा खंडित, इन्व्हर्टरही पडले बंद.
रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने उपचारात विलंब.
आरोग्य विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे एका चिमुकल्याचा बळी गेल्याची संतप्त भावना.
या घटनेमुळे जिल्हा सामान्य प्रशासनावर आणि आरोग्य व्यवस्थेवर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

