
अमित कत्तीवार | विशेष जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
एटापल्ली (गडचिरोली) : जारावंडी परिसरात वन्यप्राण्यांकडून पाळीव जनावरांवरील हल्ल्यांचे सत्र सुरूच असून, आज पुन्हा जारावंडी गावापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर शेळ्यांवर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिक आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी याच परिसरात बैल, गायी तसेच इतर पाळीव जनावरांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
काही दिवसांपासून जारावंडी परिसरात वाघाच्या वावराची चर्चा असून, वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये वाघाचा वावर स्पष्टपणे आढळून आला आहे. त्यामुळे परिसरात वाघ असल्याचे अधोरेखित झाले आहे. त्यातच सातत्याने पाळीव जनावरांना लक्ष्य केले जात असल्याने शेतकरी आणि पशुपालकांमध्ये चिंता वाढली आहे. आजची घटना गावापासून केवळ तीन किलोमीटर अंतरावर घडल्याने वाघाचा वावर मानवी वस्तीजवळपर्यंत पोहोचल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, पाळीव जनावरांवरील हल्ल्यांच्या घटना वाढत असताना आता वन विभागाने केवळ गस्त आणि सतर्कतेच्या सूचना न देता ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वन विभागाने परिसरात गस्त वाढवून वाघाच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवावे तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सततच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, भविष्यात मनुष्यावर हल्ला होण्यापूर्वीच वन विभागाने परिस्थिती गांभीर्याने घेणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वाघाला जेरबंद करण्यासाठी किंवा त्याला सुरक्षित अधिवासात हलविण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर व तांत्रिक कार्यवाही तातडीने करण्यात यावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. अन्यथा परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता असून, प्रशासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे

