
अमित कत्तीवार | विशेष जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली : राजोली–जमगाव–जडेगाव–पैडी–कोटमी या पाच गावांना जोडणारा सुमारे 19 किलोमीटर लांबीचा ग्रामीण रस्ता अवघ्या चार-पाच वर्षांतच उखडल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सन 2020-21 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बांधण्यात आलेला हा रस्ता परिसरातील नागरिकांसाठी गडचिरोलीकडे जाणारा प्रमुख मार्ग आहे. मात्र, बांधकामानंतर पहिल्याच वर्षापासून डांबरीकरण उखडण्यास सुरुवात झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
सध्या या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. डांबर पूर्णपणे निघून गिट्टी बाहेर आली आहे. पावसाळ्यात रस्त्यावर चिखल आणि खड्ड्यांमुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होते. रुग्णवाहिका, शालेय बस तसेच शेतीमालाची वाहतूक करताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे अपघाताचा धोकाही वाढला आहे.

या मार्गावर राजोली, जमगाव, जडेगाव, पैडी आणि कोटमी या पाच गावांतील सुमारे पाच हजार नागरिक अवलंबून आहेत. कसनसूरहून गडचिरोलीकडे जाण्यासाठी हा मार्ग तुलनेने सरळ असल्याने कर्मचारी, विद्यार्थी, व्यापारी आणि नागरिकांची दररोज मोठ्या प्रमाणात ये-जा असते. रस्ता खराब झाल्याने नागरिकांचा वेळ आणि वाहनांचा खर्च वाढत असून, पावसाळ्यात परिस्थिती अधिकच गंभीर होत आहे.
पाचही गावांचे सरपंच व ग्रामस्थांनी प्रशासनाकडे निवेदन देऊन रस्त्याची तातडीने पाहणी करून संपूर्ण डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे. कायमस्वरूपी दुरुस्ती होईपर्यंत रस्त्यावरील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजवावेत तसेच निकृष्ट कामासाठी जबाबदार ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे
पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होण्याआधीच रस्ता उखडला; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
सार्वजनिक बांधकामातील प्रत्येक कामाचा कालावधी साधारण पाच वर्षांचा असतो. मात्र,राजोली–जमगाव–जडेगाव–पैडी–कोटमी या 19 किमी रस्त्याचे काम पूर्ण होऊन पाच वर्षांचा कालावधीही पूर्ण होण्याआधीच संपूर्ण रस्ता उखडल्याने कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारासह संबंधित अधिकारी यांच्यावर तातडीने चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पैडी येथील ग्रामस्थ दीपक नितीन पदा यांनी केली आहे. येत्या एक महिन्याच्या आत संबंधितांवर कारवाई झाली नाही, तर पाचही गावांतील ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही पदा यांनी प्रशासनाला दिला आहे.

