
दोन महिलांकडून ५० हजारांहून किमतीचा मुद्देमाल जप्त; देशी दारू, विदेशी दारू व मोह सडवा ताब्यात
चामोर्शी,दि.११ जूलै : अवैध दारूविक्री आणि हातभट्टी दारू निर्मितीविरोधात चामोर्शी पोलिसांनी धडक कारवाई करत दोन महिलांकडून एकूण ५० हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे अवैध दारूविक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी गेटजवळ एका महिलेजवळ काळ्या रंगाच्या बॅगेत हायवर्ड कंपनीचे १५ निप सीलबंद डबे, किंमत ५ हजार २५० रुपये, तसेच देशी दारूच्या ७० निपा, किंमत ५ हजार ६०० रुपये, असा एकूण १० हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. याप्रकरणी गायत्री विजेंद्र गौरकर (वय २६, रा. चामोर्शी) हिच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.

तर दुसऱ्या कारवाईत गौरी उज्वल मंडल (वय ३२) हिच्याकडून दोन प्लास्टिक ड्रममध्ये प्रत्येकी १०० लिटर प्रमाणे एकूण २०० लिटर मोह सडवा, अंदाजे ४० हजार रुपये किमतीचा, असा मुद्देमाल पोलिसांनी पकडला.
अशाप्रकारे दोन्ही कारवायांमध्ये एकूण ५० हजार ८५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार धनंजय मेश्राम व पोलीस शिपाई मानकर यांनी केली.
अवैध दारूविक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांची मोहीम तीव्र
चामोर्शी परिसरात अवैध दारूविक्री व हातभट्टी दारूविरोधात पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली असून, अशा प्रकारच्या अवैध व्यवसायावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा संदेश या कारवाईतून मिळाला आहे. पोलिसांच्या धडक कारवाईमुळे अवैध दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

