
कंपनीकडून घोर अन्याय; कामगार अधिकाऱ्यांनी घेतली दखल, थकीत वेतन तात्काळ देण्याचे निर्देश
जिल्हा प्रतिनिधी |नितेश गट्टीवार
गडचिरोली : जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयांमध्ये रुग्णांचे वस्त्र धुलाईचे अत्यावश्यक काम करणाऱ्या तब्बल २५ धोबी कामगारांना मागील दहा महिन्यांपासून वेतन/मानधन मिळाले नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गरीब व कष्टकरी कामगारांकडून सलग दहा महिने प्रामाणिकपणे काम करून घेतल्यानंतरही त्यांच्या मेहनतीचा मोबदला न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांतील रुग्णांचे वस्त्र धुलाईचे काम महाराष्ट्र शासनाने मे. आनंद केमीकेट्स, पुणे या कंपनीला कराराने दिले आहे. या कामासाठी कंपनीने सुमारे दहा महिन्यांपूर्वी धोबी समाजातील २५ पुरुष व महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. नियुक्ती झाल्यापासून हे कर्मचारी रुग्णालयातील वस्त्र धुलाईचे काम नियमितपणे पार पाडत आहेत. मात्र, काम करूनही मागील दहा महिन्यांचे वेतन न मिळाल्याने या कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.
या गंभीर प्रकाराबाबत कर्मचाऱ्यांनी आपली कैफियत शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय गडचिरोली यांच्याकडे मांडली. मात्र, अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने अखेर श्री. विनायक कावळे, श्री. भक्तदास गडपायले यांच्यासह २५ कर्मचाऱ्यांनी कामगार अधिकारी, गडचिरोली यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून न्यायाची मागणी केली.
या तक्रारीची कामगार विभागाने गंभीर दखल घेतली. १० ऑगस्ट २०२६ रोजी कामगार अधिकारी, गडचिरोली यांच्या कार्यालयात जिल्हा रुग्णालयाचे प्रतिनिधी, संबंधित कंपनीचे प्रतिनिधी तसेच तक्रारदार कर्मचारी यांची उपस्थितीत सुनावणी घेण्यात आली. यावेळी सर्व संबंधितांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले.
या सुनावणीदरम्यान कंपनीचे प्रतिनिधी तसेच जिल्हा रुग्णालयाच्या प्रतिनिधींच्या बयानातून संबंधित कर्मचाऱ्यांना मागील दहा महिन्यांचे वेतन/मानधन अदा झाले नसल्याची बाब समोर आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या कष्टकरी कामगारांवर झालेल्या अन्यायाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
कामगार अधिकाऱ्यांची कंपनीला तंबी
कामगार अधिकारी, गडचिरोली यांनी प्रकरणाची दखल घेत संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींना कर्मचाऱ्यांचे थकीत दहा महिन्यांचे वेतन/मानधन तात्काळ अदा करावे, अन्यथा कंपनीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट तंबी दिल्याची माहिती आहे.
दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी श्री. विनायक कावळे यांच्या विनंतीवरून महाराष्ट्र राज्य वरठी-परीट-धोबी समाज महासंघ (सर्व भाषिक)चे ज्येष्ठ मार्गदर्शक तथा प्रदेश उपाध्यक्ष श्री. भैय्याजी रोहणकर, चंद्रपूर येथून गडचिरोली येथे दाखल झाले. त्यांनी कामगार अधिकारी यांची भेट घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा केली.
‘न्याय मिळेपर्यंत महासंघ कर्मचाऱ्यांच्या पाठीशी’
यावेळी कामगार अधिकारी यांनी सकारात्मक भूमिका घेत कायद्याच्या चौकटीत राहून संबंधित कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.
भैय्याजी रोहणकर यांनीही धोबी समाजातील या कष्टकरी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य वरठी-परीट-धोबी समाज महासंघ सर्व भाषिक ठामपणे त्यांच्या पाठीशी उभा असल्याचे स्पष्ट केले. कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन न मिळाल्यास संघटनेच्या माध्यमातून कंपनीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासोबतच गरज पडल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
लेबर कोर्टात जाण्याचा इशारा
पुढील दोन संधींमध्ये कंपनीने कर्मचाऱ्यांचे थकीत दहा महिन्यांचे वेतन/मानधन अदा केले नाही, तर प्रकरण लेबर कोर्टात दाखल करण्यात येईल, अशी भूमिका महासंघाने घेतली आहे.
त्याचबरोबर थकीत वेतनासह पीएफ व व्याजाची रक्कम कायदेशीर मार्गाने वसूल करून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले.
रुग्णालयातील रुग्णांचे कपडे स्वच्छ ठेवण्यासारखे अत्यावश्यक काम करणाऱ्या या कष्टकरी कर्मचाऱ्यांनाच दहा महिन्यांपासून त्यांच्या श्रमाचा मोबदला मिळत नसल्याने ‘कामगारांच्या श्रमाची किंमत कोण देणार?’ असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. आता कामगार विभागाच्या हस्तक्षेपानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना थकीत वेतन कधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

