
पाणी ओसरल्याने परिस्थितीत सुधारणा; आजारी विद्यार्थिनीला एसडीआरएफच्या मदतीने सुरक्षितपणे आरोग्य केंद्रात दाखल
गडचिरोली, दि. २६ सप्टेंबर : छत्तीसगड राज्यातील पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका भामरागड परिसराला बसला. नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने निर्माण झालेल्या पूरस्थितीत प्रशासनाने तत्काळ बचाव व स्थलांतर मोहीम राबवत तब्बल ५२५ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले. काल दुपारपासून रात्री उशिरापर्यंत ही कार्यवाही सुरू होती. दरम्यान, आता पाणी ओसरू लागल्याने परिस्थितीत हळूहळू सुधारणा होत आहे.
पूरस्थितीची माहिती मिळताच जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसीलदार किशोर बागडे यांच्या नेतृत्वात स्थानिक प्रशासनाने युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या. नदीकाठच्या तसेच सखल भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. प्रशासनाच्या पथकांनी बाधित भागात प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले.

आजारी विद्यार्थिनीला दिला मदतीचा हात
दरम्यान, बिनागोंडा आश्रमशाळेतील एका आजारी विद्यार्थिनीला तातडीच्या उपचारांची गरज असल्याने एसडीआरएफ पथकाच्या मदतीने गुंडेनूर नाला सुरक्षितपणे पार करून तिला लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
पुराच्या परिस्थितीतही प्रशासन व बचाव पथकांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे विद्यार्थिनीला वेळेत वैद्यकीय उपचार मिळू शकले.
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
पाणीपातळी कमी होत असली तरी परिस्थिती पूर्णपणे सामान्य झालेली नाही. त्यामुळे नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे तसेच पाणी वाहत असलेल्या रस्ते, पूल किंवा नाल्यांमधून प्रवास करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
पूरस्थितीवर प्रशासनाचे सातत्याने लक्ष असून, आवश्यकतेनुसार बचाव व मदतकार्य करण्यासाठी पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.

