
१६ ऑगस्टपासून शेतकरी-कामगार पक्षाचा बेभान ठिय्या आंदोलनाचा इशारा; प्रशासनासोबत प्राथमिक चर्चेत मागण्यांवर खल
भेंडाळा प्रतिनिधी
भेंडाळा: सुरजागड ते गडचिरोली असा लाँग मार्च काढत १६ ऑगस्ट २०२६ पासून गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेभान ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी-कामगार पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आंदोलनकर्त्यांशी प्राथमिक चर्चा घडवून आणत त्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा केली.

शेतकरी-कामगार पक्षाच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत लाँग मार्चच्या प्रमुख मागण्या तसेच अनुषंगिक प्रश्नांवर प्राथमिक स्वरूपात सविस्तर चर्चा करण्यात आली. या मागण्या शासनस्तरावरील असल्याने त्यावर वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा व समन्वय साधण्याची भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.
या बैठकीमुळे आंदोलनाची तीव्रता कमी करण्यासाठी प्रशासनाकडून संवादाचा मार्ग स्वीकारण्यात आल्याचे चित्र आहे. मात्र, मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्यास १६ ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
नेतृत्वात मोठी फळी मैदानात
शेतकरी-कामगार पक्षाच्या आंदोलनाला आदिवासी, भटके-विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते यांच्या नेतृत्वाची धार मिळाली आहे. मध्यवर्ती समिती सदस्य भाई शामसुंदर उराडे, युवक नेते भाई अक्षय कोसनकर, जयश्रीताई वेळदा, जिल्हा समिती सदस्य तुळशिदास भैसारे, रमेश चाखुंडे, प्रभाकर गव्हारे, डंबाजी भोयर, राजू केळझरकर, चंद्रकांत भोयर, अशोक किरंगे, दामोदर रोहनकर, पांडुरंग गव्हारे, चिरंजीव पेंदाम, रामजी गुम्मा, विलास अडेंगावार, योगेश चापले, अंकुश नेताम, राहुल कोठारे, सुरज मडावी, रोहिणी उईके, नूतन वेळदा, सोनाली कवडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मागण्यांवर तोडगा निघणार की आंदोलन पेटणार?
प्रशासनासोबत प्राथमिक चर्चा झाल्यानंतर आता आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर शासनाकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. १६ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या लाँग मार्च आणि ठिय्या आंदोलनामुळे गडचिरोलीच्या राजकीय व प्रशासकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडण्याची शक्यता आहे.

