
१७ ऑगस्टपासून धार्मिक सोहळ्याला सुरुवात; सायंकाळी ६ वाजता होणार भव्य आरती
जिल्हा प्रतिनिधी| नितेश गट्टीवार
गडचिरोली/चामोर्शी,दि.११ ॶॉगस्ट :विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री मार्कंडेश्वर देवस्थान, मार्कंडादेव येथे श्रावण महिन्यानिमित्त भाविकांसाठी विशेष धार्मिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी सायंकाळी ६ वाजता ‘महागंगा आरती’ करण्यात येणार आहे.

१७ ऑगस्ट २०२६ पासून या विशेष आरतीला सुरुवात होणार असून, वैंगंगा नदीच्या पवित्र तीरावर मंत्रोच्चार, आरती, दीपप्रज्वलन आणि भक्तिमय वातावरणात हा धार्मिक सोहळा पार पडणार आहे.
श्री मार्कंडेश्वर देवस्थान हे विदर्भातील प्रमुख धार्मिक व आध्यात्मिक स्थळांपैकी एक असून, श्रावण महिन्यात येथे भगवान महादेवाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. यंदाच्या ‘महागंगा आरती’मुळे मंदिर परिसरात भक्तिमय आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण होणार आहे.
आरतीच्या निमित्ताने नदीकाठी दीपप्रज्वलन करण्यात येणार असून, भाविकांना या पवित्र सोहळ्याचा लाभ घेता येणार आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या या महागंगा आरतीमध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

