
हर्षवर्धन बाबा आत्राम व डॉ. मिताली अक्का आत्राम यांचे निवेदन; पाणीटंचाई, रेगुंटा सबस्टेशनसह विविध विकासकामांचे प्रश्न मांडले

अमोल मारकवार | तालुका प्रतिनिधी
अहेरी : अहेरी विधानसभा क्षेत्रातील अहेरी, एटापल्ली, मुलचेरा, भामरागड आणि सिरोंचा या पाच तालुक्यांमध्ये निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता या पाचही तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

*माजी. मंत्री तथा विद्यमान आमदार राजे डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या आदेशानुसार युवा नेते हर्षवर्धन बाबा आत्राम व डॉ. मिताली अक्का आत्राम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* यांची भेट घेऊन अहेरी विधानसभा क्षेत्रातील विविध ज्वलंत प्रश्न आणि नागरिकांच्या समस्यांबाबत सविस्तर निवेदन सादर केले.
यावेळी अहेरी, एटापल्ली, मुलचेरा, भामरागड आणि सिरोंचा या पाच तालुक्यांतील दुष्काळसदृश परिस्थितीचा विचार करून संबंधित तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करावे. तसेच शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या दुष्काळ निवारण योजनांचा लाभ मिळावा, अशी मागणी करण्यात आली.
पाणीटंचाईवर उपाय म्हणून गावागावांत बोअरवेलची मागणी
ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. नागरिकांना पाण्यासाठी होणारा त्रास लक्षात घेता पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये नवीन बोअरवेल मारण्यात याव्यात. तसेच पाणीपुरवठ्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
रेगुंटा सबस्टेशनचे काम पूर्ण; वन्यजीव विभागाच्या परवानगीअभावी पुढील काम रखडले!
*रेगुंटा येथील सबस्टेशनचे काम पूर्ण झाले असले तरी वन्यजीव विभागाची (Wildlife)* आवश्यक परवानगी मिळाली नसल्यामुळे पुढील काम सुरू होऊ शकलेले नाही. त्यामुळे वन्यजीव विभागाची परवानगी तातडीने देऊन रखडलेले काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, अशी मागणीही मुख्यमंत्री महोदयांकडे करण्यात आली. या कामाला परवानगी मिळाल्यास परिसरातील वीजपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावण्यास मदत होणार आहे.
अहेरी विधानसभा क्षेत्रातील विविध समस्यांवर चर्चा
यावेळी पाचही तालुक्यांतील रस्ते, वीज, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण तसेच इतर मूलभूत सुविधांशी संबंधित विविध प्रश्न मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शासनाने संबंधित विभागांना आवश्यक निर्देश देऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी करण्यात आली.
अहेरी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या मूलभूत समस्या शासनदरबारी मांडून त्यावर तातडीने उपाययोजना व्हाव्यात, यासाठी *हर्षवर्धन बाबा आत्राम व डॉ. मिताली अक्का आत्राम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

