
एटापल्ली : ग्रामपंचायत चोकेवाडा अंतर्गत येणाऱ्या रेखनार गावात मोबाईल नेटवर्कची सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावात तातडीने BSNL मोबाईल टॉवर उभारून नियमित नेटवर्क सेवा सुरू करावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या (CPI) वतीने करण्यात आली आहे.

सदर मागणीसंदर्भात रेखनार गावात ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत गावकऱ्यांनी मोबाईल नेटवर्कअभावी निर्माण होणाऱ्या समस्यांची माहिती CPI चे जिल्हा सहसचिव कॉम्रेड सचिन मोतकुरवार यांना दिली. त्यानंतर ही समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यावर तोडगा काढण्यासाठी निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन संपूर्ण गावातील ग्रामस्थ निवेदन देण्यासाठी एकत्र आले.
मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे नागरिकांना नातेवाइकांशी संपर्क साधणे, विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेणे, शासकीय योजनांची माहिती मिळविणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका व इतर आवश्यक सेवांशी संपर्क साधणे कठीण होत आहे. डिजिटल इंडियाच्या घोषणा होत असताना दुर्गम आदिवासी गावातील जनता मूलभूत सुविधेपासून वंचित राहणे ही गंभीर बाब असल्याचे CPI ने म्हटले आहे.

BSNL च्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रेखनार गावात तातडीने तांत्रिक सर्वेक्षण करून मोबाईल टॉवर उभारणीसाठी आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी द्यावी. टॉवर उभारणी होईपर्यंत पर्यायी तांत्रिक उपाययोजना करून नेटवर्कची समस्या दूर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
CPI चे जिल्हा सहसचिव कॉम्रेड सचिन मोतकुरवार म्हणाले, “डिजिटल इंडियाच्या घोषणा करणाऱ्या सरकारला रेखनारसारख्या दुर्गम आदिवासी गावात मोबाईल नेटवर्क उपलब्ध करून देता येत नसेल, तर या विकासाचा उपयोग काय? प्रशासनाने तातडीने BSNL मोबाईल टॉवर उभारून नेटवर्क सेवा सुरू करावी. अन्यथा, जनतेच्या हक्कांसाठी भारतीय कम्युनिस्ट पार्टी तीव्र लोकशाही आंदोलन छेडेल.”

