
अमित कत्तीवार विशेष जिल्हा प्रतिनिधी
एटापल्ली : देशभक्तीची भावना वृद्धिंगत करण्यासोबतच राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जनमानसात पोहोचविण्याच्या उद्देशाने एटापल्ली येथे आज दिनांक 12-08-2026 रोजी ‘हर घर तिरंगा’ तसेच ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांच्या स्मरणानिमित्त आयोजित विविध उपक्रमांचा उत्साहात समारोप करण्यात आला. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या १९१ बटालियनच्या पुढाकाराने हा कार्यक्रम जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, एटापल्ली येथे आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण व्हावी, यासाठी विविध उपक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत देशभक्तीपर वातावरण निर्माण केले. तिरंग्याचे महत्त्व, राष्ट्रगीत व राष्ट्रीय प्रतीकांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रभावनेशी जोडलेल्या गीताच्या ऐतिहासिक व राष्ट्रीय महत्त्वाची माहिती उपस्थितांना देण्यात आली.

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या १९१ बटालियनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधत देशसेवा, शिस्त, कर्तव्यभावना आणि राष्ट्राच्या एकात्मतेचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. देशाच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या जवानांच्या कार्याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आदराची भावना निर्माण व्हावी, तसेच युवकांनी देशाच्या विकासात सक्रिय योगदान द्यावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून १९१ बटालियनचे उपकमांडंट श्री. नरेंद्र सिंह राठोड, CRPF निरीक्षक होनाप्पा बी. तसेच जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चे प्राचार्य श्री. विजय मसराम सर, श्रीमती छाया श्रीरामे, श्री राजेंद्र जांभोडे उपस्थित होते. तसेच संबंधित अधिकारी, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि मान्यवरांची उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना देशाची एकता आणि अखंडता टिकविण्यासाठी प्रत्येक नागरिकाची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. तिरंग्याचा सन्मान राखणे, राष्ट्रहिताला प्राधान्य देणे आणि समाजात बंधुभाव वाढविणे, ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
एटापल्लीसारख्या ग्रामीण व आदिवासीबहुल भागातील विद्यार्थ्यांपर्यंत देशभक्ती व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश पोहोचविण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. राष्ट्रप्रेम, एकता आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देत या उपक्रमाचा उत्साहात समारोप करण्यात आला.

