
खांब कोसळण्याची भीती; ग्रामस्थांच्या जीविताला धोका वीज वितरण विभागाला तातडीने कार्यवाहीचे निर्देश
जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली | दि. १२ ऑगस्ट:

कोरची तालुक्यातील कामेली गावात रस्त्यालगत उभारण्यात आलेले जुने व जीर्ण वीज खांब धोकादायक स्थितीत असल्याचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. अनेक वर्षांपासून उभे असलेले हे खांब तारा ओढल्या गेल्यामुळे वाकले असून, कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, ग्रामस्थांनी ही गंभीर बाब आमदार रामदास मसराम यांच्या निदर्शनास आणून दिली.
तालुका दौऱ्यावर असताना आमदार मसराम यांनी कामेली गावाला भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी गावातील विविध समस्यांसह धोकादायक वीज खांबांचा प्रश्न मांडला. ग्रामस्थांनी परिस्थितीची माहिती देत खांबांची तातडीने दुरुस्ती अथवा नवीन खांब उभारण्याची मागणी केली.
ग्रामस्थांची तक्रार ऐकताच आमदार रामदासजी मसराम यांनी वेळ न दवडता प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन धोकादायक वीज खांबांची पाहणी केली. खांबांची अवस्था पाहून त्यांनी संबंधित वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता धोकादायक खांबांची तातडीने पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी नवीन खांब उभारावेत तसेच संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, असे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
‘दुर्घटना घडण्याची वाट न पाहता नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य’ या भूमिकेतून आमदारांनी घेतलेल्या तत्काळ दखलीमुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. समस्या समोर येताच प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित विभागाला तातडीच्या कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्याने ग्रामस्थांनी आमदार मसराम यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले.
गावातील मूलभूत सुविधा, नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित प्रश्न आणि स्थानिक समस्यांवर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.
यावेळी माजी सभापती परसरामजी टिकले, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष (कुरखेडा) जीवन पाटील नाट, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष (कोरची) मनोज अग्रवाल, धनपाल मिसार सर, माजी सभापती श्रावण मातलाम, उपसरपंच परमेश लोहम्बरे, राजेश नैताम, दानशूर हलामी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

