
नागपूर रोडवर काळाचा घाला; ट्रॅक्टरच्या धडकेत बाप-लेकीचा जागीच मृत्यू..
जिल्हा प्रतिनिधी | मुल.
नागपूर रोडवरील लक्ष्मीनारायण राईस मिल समोर बुधवारी सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. बाजार आटोपून दुचाकीने बोंडाळा (भूज) येथे आपल्या घरी परतत असताना समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला जोरदार धडक दिली.
या भीषण धडकेत राहुल नारायण पाल (३५) आणि त्यांची अवघ्या तीन वर्षांची चिमुकली मुलगी ईशा राहुल पाल यांचा दुर्दैवी अंत झाला.

या अपघातामुळे नागपूर रोड परिसरात एकच खळबळ उडाली असून, बापासोबत चिमुकल्या लेकीचा मृत्यू झाल्याने पाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल पाल हे आपल्या तीन वर्षांच्या मुलगी ईशाला दुचाकीवर घेऊन बाजारासाठी गेले होते. बाजार आटोपल्यानंतर ते आपल्या स्वगावी बोंडाळा (भूज) येथे परतत होते. दरम्यान, लक्ष्मीनारायण राईस मिलसमोर समोरून भरधाव येणाऱ्या ट्रॅक्टरची त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की, दोघांनाही गंभीर दुखापत झाली आणि काही क्षणांतच त्यांचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. घटनेची माहिती मुल पोलिसांना मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आवश्यक कार्यवाही केली.
चिमुकल्या ईशाच्या मृत्यूने हळहळ
अवघ्या तीन वर्षांच्या ईशाचा वडिलांसोबत झालेला दुर्दैवी मृत्यू मन हेलावून टाकणारा ठरला आहे. एकाच कुटुंबातील बाप-लेकीचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्याने नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयाकडे धाव घेतली. परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या भीषण अपघाताची नेमकी कारणे तसेच ट्रॅक्टर चालकाबाबतची पुढील कायदेशीर कारवाई याबाबत मुल पोलीस तपास करीत आहेत.
..Chetan Kamde News Jagar..

