
भेंडाळा परिसरातील जवळपास ५० गावांमध्ये वीजकपात; धान रोवणीच्या हंगामात शेतकरी त्रस्त
प्रलय सहारे
भेंडाळा,दि.१३ ॳॉगस्ट: गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात धान रोवणीचा हंगाम जोरात सुरू असताना महावितरण कंपनीकडून शेतीसाठी करण्यात येत असलेल्या वीजकपातीमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. मौजा भेंडाळा परिसरातील जवळपास ५० गावांमध्ये लोडशेडिंग सुरू असल्याचा आरोप शेतकरी एकता विचार मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

सध्या शेतकऱ्यांना धान रोवणीसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, शेतीपंपांसाठी केवळ आठ तास वीजपुरवठा करण्याचे धोरण सुरू असल्याने शेतकऱ्यांचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. दिवसा पुरेसा वीजपुरवठा मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री शेतशिवारात जाऊन पिकांना पाणी द्यावे लागत आहे.
विशेष म्हणजे परिसरात वाघांसह इतर हिंसक वन्यप्राण्यांचा वावर असल्याने रात्रीच्या वेळी शेतात जाणे शेतकऱ्यांसाठी जीवघेणे ठरत आहे. एका बाजूला वन्यप्राण्यांची भीती आणि दुसऱ्या बाजूला अपुऱ्या वीजपुरवठ्याचे संकट, अशा दुहेरी कोंडीत शेतकरी सापडला आहे.
गडचिरोली जिल्हा विकासाच्या दिशेने मोठी झेप घेत असून औद्योगिक विकासामुळे जिल्ह्याची ‘स्टील सिटी’ म्हणून ओळख निर्माण होत असताना, दुसरीकडे अन्नदाता शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक वीज मिळत नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याची भावना शेतकरी एकता विचार मंचाचे रमेश चौकुंडे यांनी व्यक्त केली.
“धान रोवणीचा अत्यंत महत्त्वाचा हंगाम सुरू असताना शेतकऱ्यांना पुरेसा वीजपुरवठा मिळणे आवश्यक आहे. रात्रीच्या वेळी जीव धोक्यात घालून शेतात जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणे हे प्रशासनाचे अपयश आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत भेंडाळा परिसरातील लोडशेडिंग तात्काळ बंद करून शेतीसाठी सुरळीत वीजपुरवठा करण्याचे आदेश द्यावेत. अन्यथा शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल,” असा इशारा रमेश चौकुंडे यांनी सरकार व महावितरण प्रशासनाला दिला.
यासंदर्भात संबंधित प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकरी एकता विचार मंचाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.
आठ दिवसांची मुदत; आता प्रशासनाच्या भूमिकेकडे शेतकऱ्यांचे लक्ष
शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना पुरेसा आणि नियोजित वीजपुरवठा न झाल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे महावितरण प्रशासन आणि शासन या मागणीची कितपत गांभीर्याने दखल घेते, याकडे भेंडाळा परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

