
चंद्रपूरच्या करिष्माला MPSC मध्ये उत्तुंग यश; अनुसूचित समाजातील महिला गटात राज्यात प्रथम
जिल्हा प्रतिनिधी !
चिमूर : चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील वडसी गावची कन्या करिष्मा अनिरुद्ध मेश्राम हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत अनुसूचित समाजातील महिला गटातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशामुळे करिष्माची सहाय्यक वनसंरक्षक पदावर निवड झाली असून, तिच्या कामगिरीने चिमूर तालुक्यासह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि विविध संघर्षांवर मात करत करिष्माने मिळवलेले हे यश तिच्या जिद्दीचे, सातत्यपूर्ण मेहनतीचे आणि आत्मविश्वासाचे फलित मानले जात आहे. तिच्या यशामागे आई-वडिलांनी घेतलेले कष्ट, दिलेले प्रोत्साहन आणि कुटुंबीयांचा भक्कम पाठिंबा यांचाही मोठा वाटा आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर अनेकदा आर्थिक आणि शैक्षणिक अडचणी उभ्या राहतात. मात्र, परिस्थितीवर मात करून ध्येय गाठता येते, याचा प्रेरणादायी आदर्श करिष्माने आपल्या यशातून निर्माण केला आहे. विशेषतः ग्रामीण भागातील मुलींसाठी तिची यशोगाथा आत्मविश्वास आणि प्रेरणा देणारी ठरली आहे.
करिष्माच्या या दैदिप्यमान यशाबद्दल वडसी गावासह चिमूर तालुक्यात आणि चंद्रपूर जिल्ह्यात तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सहाय्यक वनसंरक्षक या जबाबदारीच्या पदावर कार्यरत होताना करिष्मा भविष्यातही आपल्या कर्तृत्वाची नवी उंची गाठेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
ग्रामीण संघर्षातून राज्यातील अव्वल स्थानापर्यंत पोहोचलेली करिष्माची ही यशोगाथा हजारो विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
📝.. Chetan Kamde News Jagar..

