
तीन मातांवर यशस्वी शस्त्रक्रिया; तिघींनी दिला निरोगी बाळांना जन्म — दुर्गम भागातील गर्भवती महिलांना मोठा दिलासा
श्री.नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
कोरची : अतिदुर्गम आणि आदिवासीबहुल कोरची तालुक्याच्या आरोग्य क्षेत्रासाठी ऐतिहासिक आणि अभिमानास्पद घटना घडली आहे. सन 1996 मध्ये ग्रामीण रुग्णालय सुरू झाल्यापासून तब्बल 30 वर्षांनंतर प्रथमच कोरची ग्रामीण रुग्णालयात तीन गर्भवती महिलांवर यशस्वी सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. विशेष म्हणजे, तिन्ही मातांनी निरोगी बाळांना जन्म दिला असून माता व नवजात बालकांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. कमलेश पारसवाणी यांनी दिली.

कोरचीसारख्या दुर्गम तालुक्यात सिझेरियनसारखी अत्यावश्यक प्रसूती सेवा स्थानिक पातळीवर सुरू होणे ही आरोग्य व्यवस्थेतील मोठी उपलब्धी मानली जात आहे. यापूर्वी सिझेरियनची आवश्यकता भासलेल्या गर्भवती महिलांना उपचारासाठी गडचिरोली किंवा कुरखेडा येथे रेफर करावे लागत होते. त्यामुळे प्रसूतीच्या वेळी महिलांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा प्रवास, आर्थिक खर्च तसेच वेळेचा सामना करावा लागत होता. अनेकदा आपत्कालीन परिस्थितीत हा प्रवास अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता होती.
आता कोरची ग्रामीण रुग्णालयातच सिझेरियनची सुविधा उपलब्ध झाल्याने तालुक्यातील दुर्गम गावांमधील गर्भवती महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रसूतीच्या गंभीर परिस्थितीत वेळेत उपचार मिळण्यास मदत होणार असून, मातामृत्यू व नवजात बालकांच्या आरोग्याशी संबंधित धोके कमी करण्याच्या दृष्टीनेही ही सुविधा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
वैद्यकीय पथकाच्या अथक प्रयत्नांना यश
कोरची ग्रामीण रुग्णालयात पार पडलेल्या या तीनही सिझेरियन शस्त्रक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक तथा स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वर्षा लहाडे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नंदकुमार माळकोळीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कमलेश पारसवाणी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मडावी, बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण इरपाते आणि भूलतज्ज्ञ डॉ. समीर बनसोडे तसेच ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून यशस्वीपणे पार पडल्या.
या उपक्रमामागे जिल्हा शल्यचिकित्सक तथा स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वर्षा लहाडे यांचे मार्गदर्शन व पुढाकार महत्त्वाचा ठरला. त्यांच्या नियोजन आणि तांत्रिक सहकार्यामुळे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कमलेश पारसवाणी यांनी कोरची ग्रामीण रुग्णालयात सिझेरियन प्रसूती सेवा सुरू करण्याचा उपक्रम प्रत्यक्षात आणला.
तीन दशकांची प्रतीक्षा अखेर संपली
ग्रामीण रुग्णालयाची स्थापना 1996 मध्ये झाल्यानंतर तब्बल तीन दशकांपर्यंत कोरचीत सिझेरियन शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे गरज भासल्यास रुग्णांना इतर ठिकाणी हलविणे हा एकमेव पर्याय होता. आता पहिल्यांदाच स्थानिक रुग्णालयात तीन सिझेरियन यशस्वी झाल्याने कोरचीच्या आरोग्य क्षेत्रात नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.
दुर्गम मातांसाठी ठरणार वरदान
कोरची तालुक्यात अनेक गावे दुर्गम आणि जंगल भागात वसलेली आहेत. अशा गावांमधून गडचिरोली किंवा कुरखेडा येथे पोहोचण्यासाठी मोठे अंतर पार करावे लागते. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात रुग्णालय गाठणे अधिक आव्हानात्मक ठरते.
त्यामुळे स्थानिक पातळीवर सिझेरियनची सुविधा उपलब्ध होणे ही महिलांसाठी मोठी गरज होती.
“कोरचीतच सिझेरियनची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे आता गर्भवती महिलांना प्रसूतीच्या वेळी दूरच्या रुग्णालयात जाण्याची धावपळ कमी होणार आहे,” अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
सुविधा नियमित सुरू राहण्याची अपेक्षा
तब्बल 30 वर्षांनंतर सुरू झालेली ही सेवा केवळ एकदाच न राहता नियमित आणि सातत्याने उपलब्ध राहावी, यासाठी आवश्यक मनुष्यबळ, औषधे, उपकरणे आणि तांत्रिक सुविधा कायम उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
भविष्यात कोरची ग्रामीण रुग्णालयात आणखी अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्यास दुर्गम भागातील नागरिकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.
तीन मातांवर यशस्वी सिझेरियन आणि तिघींनी निरोगी बाळांना जन्म दिल्याने कोरची ग्रामीण रुग्णालयाच्या इतिहासात हा दिवस निश्चितच सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाणार आहे.

