
नितेश गट्टीवार गडचिरोली,दि. १५ :
अनुसूचित जाती-जमातींवरील अत्याचार प्रकरणांमध्ये मृत्यू पावलेल्या पीडितांच्या कुटुंबातील वारसांना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या शासन निर्णयाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करत समाज कल्याण विभागाच्या वतीने ९ पीडित कुटुंबीयांना शासकीय नोकरीत नियुक्ती देण्यात आली. या नियुक्त्यांना जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मंजुरी दिली असून, आज आयोजित समता सप्ताह समारोप सोहळ्यात संबंधित लाभार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.
समाज कल्याण विभाग सभागृहात आयोजित या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे व अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. यावेळी नियुक्त झालेल्या लाभार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

याच कार्यक्रमात समाज कल्याण विभागांतर्गत वसतिगृह व ग्रंथालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत उपस्थित मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी करून शासन निर्णयाची माहिती व त्यामागील उद्देश स्पष्ट केला. त्यांनी अत्याचारग्रस्त कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेखाधिकारी कुलदीप मेश्राम यांनी केले.

