
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
कोरची.
कोरची नगरपंचायत क्षेत्रात पाणीपुरवठा यंत्रणेच्या घोर हलगर्जीपणाची भयावह घटना समोर आली आहे. आज सकाळी साडेसातच्या दरम्यान मन्साराम मडावी यांच्या घराजवळच्या सार्वजनिक नळावर, महिला पाणी भरत असताना, एक मीटर पेक्षा जास्त लांबीचा जिवंत नाळू ( पाण्यातील जन्तु ) थेट बाहेर पडला. ही घटना पाहून पाणी भरत असलेल्या महिला घाबरल्या.
सदर प्रतिनिधी जवळ महिलांनी सांगितले की, नळ सुरू केल्याबरोबर प्रथम काळ्या रंगाचे घाणेरडे पाणी येते,त्यात बऱ्याचदा अळ्या दिसतात. आज एक मीटर पेक्षा जास्त लांबीचा जंतू निघाला. त्यामुळे आमच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून नगरपंचायतने यावर उपाययोजना करावी.

कोरची येथील मुख्य पाण्याच्या टाकीला गेल्या वीस वर्षापासून एकदाही सफाई करण्यात आलेली नाही.
तहसीलदार तथा मुख्याधिकारी प्रशांत गड्डम यांच्या निवासस्थानाला लागूनच पाण्याची टाकी आहे. जानेवारी महिन्यात जिल्हाधिकारी अभिषेक पान्ड्या कोरचीच्या दौर्यावर असताना कोरची येथील पिण्याच्या पाण्याविषयी प्रश्न केला तेव्हा तहसीलदारांनी पिण्याच्या पाण्याच्या टाकीची समस्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले होते. नळातून दुर्गंधीयुक्त पाणी येते, चव पूर्णपणे खराब असते, गावकऱ्यांना दुसरा पर्याय नसल्याने पाणी घेतात.
दूषित पाण्यामुळे कोरचित आरोग्य समस्या विकोपाला गेली आहे. पोट दुखी, उलटी,जुलाब,डोकेदुखी, त्वचारोग,कावीळ आणि इतर जलजन्य रोगांची साथ सतत सुरू असते.लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती सर्वाधिक बळी पडत आहेत.
गावकऱ्यांनी यापूर्वी अनेकदा नगरपंचायत ला लिखित निवेदन दिले आहे. शिष्टमंडळ पाठवले. मोर्चे काढले.आमरण उपोषण केले. नगरपंचायत प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी नगरपंचायत कार्यालयाला कुलूप लावण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळी नगरपंचायत प्रशासनाकडून आश्वासना व्यतिरिक्त काहीही हाती लागले नाही.
दुसरीकडे गरज नसलेल्या ठिकाणी सीसी रोड, नालीचे बांधकाम सुरू असून स्वार्थासाठी निधीचा दुरुपयोग होत असल्याचे एका नगरसेवकाने सांगितले त्यांनी असेही सांगितले की, नगरपंचायत मुख्याधिकारी, सभापती आणि अभियंता यांना लोकांच्या जीवाची पर्वा नाही.निधी येतो पण काम होत नाही. काही निवडक पदाधिकारी, नगरसेवक, ठेकेदार आणि अधिकारी मिळून लूट करतात.
गावकऱ्यांची मागणी आहे की, पाण्याच्या टाकीची तात्काळ आणि पूर्ण सफाई करावी, पाण्याची प्रयोगशाळेत तपासणी करून अहवाल जाहीर करावा, दूषित पाण्याचा पुरवठा बंद करून टॅंकरने स्वच्छ पिण्याचे पाणीपुरवठा करावा, अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करावी, नवीन पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करावे.
वरील समस्या सुटल्या नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठे आंदोलन सुरू करण्यात येतील असे गावकरी बोलत आहेत

