
नितेश गट्टीवार गडचिरोली/मुलचेरा दि.११ एप्रिल:
स्थानिक नेताजी सुभाषचंद्र हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या सभागृहात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ‘कार्यकर्ता मेळावा तथा आढावा बैठक’अत्यंत उत्साहात पार पडली. माजी मंत्री तथा अहेरी विधानसभेचे विद्यमान आमदार डॉ.राजे धर्मराव बाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा संपन्न झाला.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी आगामी काळातील पक्षाची ध्येयधोरणे आणि संघटनात्मक बांधणीवर भर दिला. कार्यकर्त्यांनी तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचून शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ‘वन वैभव शिक्षण मंडळ, अहेरी’ चे सचिव बबलू भैया हकिम उपस्थित होते. तसेच विशेष अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम,सुंदरनगरच्या सरपंच जया पारितोष मंडल यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले.
बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुलचेरा तालुका अध्यक्ष तथा माजी जि.प. सभापती युधिष्ठिर विश्वास यांनी तालुक्यातील पक्ष संघटनेचा आढावा सादर केला. तसेच माजी पंचायत समिती सदस्य व समाजसेवक शैलेन्द्र महेंद्र खराती यांनीही आपले विचार मांडले.
सामाजिक कार्यकर्ता कमलेश अमूल्य सरकार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला.कार्यक्रमाच्या शेवटी माजी ग्रामपंचायत सदस्य श्यामलं पाल यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
या मेळाव्याला मुलचेरा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, विविध सेलचे अध्यक्ष आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून आगामी निवडणुकांच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

