
-
जिवती येथे स्व. गोदरू पाटील जुमनाके यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन
न्युज जागर -योगेश रामटेके
जिवती :- येथे तालुक्याचे निर्माते, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे दिवंगत प्रदेशाध्यक्ष स्व. गोदरू पाटील जुमनाके यांच्या दि. 18 पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कोरपना तालुक्याचे विभाजन करून जिवती या नव्या तालुक्याची निर्मिती झाली, तालुक्याच्या निर्मितीसाठी एक आंदोलन उभे करण्यामध्ये स्व. गोदरू पाटील जुमनाके यांचे मोठे योगदान होते, म्हणून त्यांना तालुक्याचे शिल्पकार अशी पूर्ण जिल्हात ओळख आहे, अनेक काळामध्ये त्यांनी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे सदस्य पदही भूषवले होते, तसेच जिवती तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले, गोंडवाना आदिवासी शिक्षण संस्था माणिकगड जिवतीची स्थापना करून तालुक्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि उत्तम शिक्षण मिळावे म्हणून गोंडवाना महाविद्यालयाची स्थापना केली, 2019 मध्ये राजुरा विधानसभा निवडणूक त्यांनी गोंडवाना गणतंत्र पार्टीकडून लढवून 45000 हजार मताधिक्य घेऊन प्रस्थापितांच्या पायाखालची वाळू सरकवली होती, पुढे जाऊन दिवंगत जुमनाके यांची गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष पदीही निवड करण्यात आली होती. त्यांनी त्यांच्या अल्प कार्यकाळात गोंडवाना गणतंत्र पार्टीचे मोठे संघटन आणि कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभी केली आहे. आदिवासी समाजासाठी ही त्यांनी मोठं काम केलं असल्याने आदिवासी समाजात ते चांगलेच लोकप्रिय होते. त्यांच्या याच कार्याच्या आठवणींना पुन्हा उजाळा देण्यासाठी दि. 18 डिसेंबर रोजी त्यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गोंडवाना महाविद्यालय जिवती येथील त्यांच्या समाधी स्थळावरील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन त्यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमास गोंडवाना गणतंत्र पार्टीचे राजुरा विधानसभा तथा निवडणूक प्रमुख गजानन पाटील जुमनाके, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग जाधव, जंगोदेवी देवस्थान कमेटीचे अध्यक्ष चंदू वेट्टी, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिवती तालुकाध्यक्ष हनुमंत कुमरे, जिवती नगरपंचायतीचे उपाध्यक्ष जमालुद्दिन शेख, नगरसेवक ममताजी जाधव, माजी सभापती भीमराव मेश्राम, ज्येष्ठ नेते भीमराव पाटील जुमनाके, नगरसेविका सतलूबाई जुमनाके, नगरसेविका लक्ष्मीबाई जुमनाके, गोंडवाना महाविद्यालये प्राचार्य डॉ. पांडुरंग सावंत, संकेत कुळमेथे, मतीन शेख, मंगेश पंधरे, उमेश आडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.


