
फडणवीसांनी आमदारांना सुनावलं; वाचा ५ घडामोडी
News jagar विधानसभा अधिवेशन विशेष – सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी भाजपाच्या आमदारांनी विशेष लक्षवेधी सूचनेद्वारे केली… महापालिकेची निवडणूक तोंडावर असताना कल्याणमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटात टोकाचे वाद निर्माण झाले… लाडक्या बहिणींना विरोध केल्यास घरी बसावे लागेल, असा इशारा मुख्यमंत्री फडणवीसांनी आमदारांना दिला… माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही काँग्रेस पक्षाची ढ टीम असल्याची टीका मंत्री नितेश राणे यांनी केली… महाराष्ट्रात लवकरच ‘अजितपर्व’ येणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला… या सर्व घडामोडींचा सविस्तर आढावा घेऊ…
तुकाराम मुंढेंच्या निलंबनाची मागणी
सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी भाजपाचे आमदार कृष्णा खोपडे आणि प्रवीण दटके यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विशेष लक्षवेधी सूचनेद्वारे केली. २०२० मध्ये नागपूर येथे सेवा कर्तव्य बजावत असताना तुकाराम मुंढे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप भाजपा आमदार खोपडे यांनी केला. त्यावेळी एका महिला कर्मचाऱ्यांने स्वाक्षरी केली नाही म्हणून त्यांनी स्वत:च्या कक्षात बोलावून त्यांना शिवीगाळ केल्याचा मुद्दाही भाजपा आमदाराने उपस्थित केला. कर्मचारी महिलेने सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. परंतु गृहमंत्रिपदाची सूत्रे अनिल देशमुख यांच्या हाती असल्याने मुंढे यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे मी आणि आमदार प्रवीण दटके यांनी त्यांच्या निलंबनाची मागणी करणारी लक्षवेधी आणली आहे, अशी भूमिका खोपडे यांनी मांडली आहे. तुकाराम मुंढे यांनी काटोल मार्गावर पाच हजार खाटेचे रुग्णालय सुरू केले आणि दुसऱ्याच दिवशी त्याचा सत्तानाश झाला. त्यात कोट्यवधी रुपये बरबाद केले. त्यामुळे त्यांना त्वरीत निलंबित करावे, असेही खोपडे म्हणाले.

भाजपा-शिंदेसेनेत टोकाचे वाद
महापालिकेची निवडणूक तोंडावर असताना कल्याणमध्ये भाजपा आणि शिंदे गटात टोकाचे वाद निर्माण झाले आहेत. डोंबिवलीतील राजकीय फोडाफोडीमुळे दोन्ही पक्षातील मतभेद काहीसे निवळले असले तरी त्याची धग अद्याप दिसून येत आहे. सोमवारी कल्याणमध्ये शिंदे गट आणि भाजपामध्ये जोरदार वाकयुद्ध रंगले. पालिका निवडणुकीत एकमेकांना संपविण्याची आणि आडवे करण्याची भाषा दोन्ही पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केल्याने नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. सोमवारी शिंदे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी भाजपाला डिवचले. कल्याण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या भागात आम्हाला कोणीही संपवू शकत नाही. महायुती म्हणून एकत्र असलो तरी महाभारतात सांगितले आहे, भाऊ शत्रू असला तरी त्याला मारल्याशिवाय विजयी मिळू शकत नाही. आमच्या मार्गात आला तर आम्ही त्यांना आडवे केल्या शिवाय राहणार नाही,’ असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी भाजपाला दिला आहे.
फडणवीसांनी आमदारांना सुनावलं
लाडक्या बहिणींना विरोध करू नका नाहीतर घरी बसावे लागेल, असा इशारा देत मुख्यमंत्री फडणवीसांनी भर सभागृहातच आमदारांना सुनावले. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात काही सदस्यांनी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख वारंवार केला. फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाच्या प्रश्नावर बोलताना काँग्रेसच्या आमदार अॅड. ज्योती गायकवाड यांनी राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला. काँग्रेस आमदार नाना पटोले यांनीही लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला. लाडक्या बहिणींना पैसे दिले, त्यामुळे निराधार योजनेचे पैसे देता नाही, असे सरकारमधील मंत्रीच सांगतात. त्यांनीही लाडकी बहीण योजनेचे खापर इतर बाबींवर फोडू नये, असा मुद्दा पटोले यांनी उपस्थित केला. भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करुन अवैध दारुविक्री बंद होत नसल्याची तक्रार केली, त्याबाबत बोलताना फडणवीसांनी आमदारांना सुनावले आहे.
नितेश राणे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही काँग्रेस पक्षाची ढ टीम असल्याची टीका मंत्री नितेश राणे यांनी केली. भाजपा हा ‘ॲनाकोंडा’ असल्याच्या ठाकरे यांच्या टीकेलाही त्यांनी आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिले. पिंपरी-चिंचवडमध्ये कोणत्याही प्रकारचा लँड जिहाद होऊ देणार नाही. हे सरकार नियम व संविधानाप्रमाणे चालणारे आहे. हिंदू राष्ट्र असल्याने जिहादी विचारांच्या व्यक्तींनी याचा बोध घ्यावा. मंदिरांच्या जागेवर लँड जिहाद करण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही. असा प्रयत्न झाल्यास त्यांना ठेचून काढण्याचे काम आम्ही करू. हिंदू विषयावर प्रखर बोलणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे. आमचं रक्त भगवं आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना ही काँग्रेसची ढ टीम आहे. हिंदूंशी दगाबाजी करून ते काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले. त्याउलट एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत येऊन हिंदुत्ववादी सरकार स्थापन केले. उद्धव ठाकरे असते तर शिंदेंना कधीच मुख्यमंत्री होऊ दिले नसते. त्यांच्या घरातून – रश्मी ठाकरे किंवा आदित्य ठाकरे – यांनाच संधी मिळाली असती, असे राणे म्हणाले.
लवकरच ‘अजितपर्व’ येणार- मिटकरींचा दावा
महाराष्ट्रात लवकरच ‘अजितपर्व’ येणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला. अजित पवार रुसून कधी बारामतीला निघून गेले नाहीत, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. महिनाभरात पंतप्रधानपदी मराठी माणूस बसू शकतो, असे भाकित माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते. त्यावर आमदार अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्रात अजितपर्व येईल, असा दावा केला आहे. अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना ही संकल्पना मांडली. त्यामुळेच निवडणुकीत महायुतीला लाडक्या बहिणींचा आधार मिळाला, असेही मिटकरी म्हणाले. एकीकडे भाजपा आणि शिंदे गट ही योजना आपल्याच नेत्यांनी आणल्याचे सांगत असताना मिटकरी यांच्या दाव्यामुळे नेमकी योजना कुणाची? अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू असल्याची चर्चा आहे.

